काही व्यक्तींच प्राण्यांवर इतकं प्रेम असतं की त्यासाठी ते जीवाचं रान करतात. त्यातही पाळीव प्राणी असेल तर त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार होतात. ब्राझीलमधील एका व्यक्तीनं आपल्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावली. कुत्र्याचा जीव वाचाव म्हणून त्याने महाकाय हिंस्त्र प्राण्याशी दोन हात केले.
डेली स्टारमध्ये दिलेल्या वृत्तानुसार Carlinhos Brasil याचा कुत्रा नाल्यावर पाणी प्यायला गेला होता. पाणी पित असताना एक अजस्त्र अॅनाकोंडाने त्याची मान पकडली. त्याने कुत्र्याला गिळायला सुरुवात केली असतानाच कुत्र्याच्या मालकाला ते समजले व तो धावत तिथे आला. आपल्या लाडक्या पेटला वाचवण्यासाठी त्यानं अॅनाकोंडावरच हल्ला केला. ही घटना ब्राझीलच्या साओ पाऊलो राज्याच्या जवळपास घडली.
कुत्र्याला वाचवण्यासाठी कार्लिनहोस वारंवार काठीने वार करत होता. अखेरीस काही मिनिटांनी त्या अजस्त्र अॅनाकोंडाने कुत्र्याला सोडले. पण कुत्र्याच्या जीवाची लढाई इथेच संपली नव्हती. त्या अॅनाकोंडाने कुत्र्याचा गळा आवळून त्याला बेशुद्ध केले होते. तब्बल ४० मिनिटे मालिश केल्यानंतर कुत्रा शुद्धीवर आला आणि त्याचा जीव वाचला.
कार्लिनहोसने सांगितले की, माझा कुत्रा वाचण्याची मी आशाच सोडून दिली होती. पण देवाच्या कृपेने माझा कुत्रा माझ्यासोबत आहे. या कुत्र्याचे नाव लायन असून अॅनाकोंडाने कुत्र्याच्या मानेवर, कानावर आणि तोंडावर बरेच घाव केले होते.