तुमच्या घरात वस्तू इतरत्र ठेवलेल्या असतील आणि तुमच्या घरात लहान मुलं किंवा पाळीव प्राणी असेल तर तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. अशी काळजी न घेतल्यानं औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खेळता खेळता ९ महिन्यांच्या कुत्रीनं चक्क कुकरची शिटी (whistle of cooker) गिळली.
ही कुत्री लॅबरेडॉर जातीची आहे. औरंगाबाद शहरात भडकल गेट भागात राहणारे मयूर जमधडे यांच्याकडे ही ९ महिन्यांची कुत्री आहे. व्या महिन्यात तिचं ब्रिडिंग करण्यात आलं. ब्रिडिंग झाल्यानंतर काही दिवसांनी कुत्री गरोदर आहे की नाही हे तपासण्यासाठी जमधडे यांनी तिचा एक्स- रे काढला.
एक्स रे काढल्यावर एक धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे, तिच्या पोटात कुकरच्या शिटीच्या आकाराची वस्तू असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यांनी १७ जुलैला शासकीय पशुचिकित्सालयात तिला नेलं. तिथे पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. आर. डिघोळे यांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र मयूर यांना शिटी पोटातून नैसर्गिकरीत्या आपोआप बाहेर पडेल, असं वाटलं. म्हणून त्यांनी आणखी काही दिवस वाट पाहिली. काही दिवस झाल्यानंतरही ती शिटी आपोआप पडली नाही.
त्यानंतर मयूर जमधडे यांनी ३ जुलै रोजी पुन्हा एकदा पशुचिकित्सालयात नेलं. तेव्हाही डॉक्टरांनी पुन्हा एका एकदा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्यांना दिला.
शिटी गिळून एक महिना झाल्यानं पोटात मुख्य आतड्यांमध्ये ही शिटी रुतून बसली होती. कुत्रीच्या पोटाचे एक्स रे काढण्यात आले. त्यानंतर पोटावर शस्त्रक्रिया असल्यानं तिला एक दिवस उपाशीही ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांनी कुत्रीवर अडीच तास शस्त्रक्रिया केली. त्यानंतर शिटी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं.