आयुष्यात कितीही पैसे कमावले तरी शेवटी पैशांपेक्षाही जास्त मोल आपल्या आयुष्यातल्या माणसांनाच असतं. वय झाल्यावर मुलांनी आपल्याकडे बघावं, आपली काळजी घ्यावी, आपल्यावर प्रेम करावं, अशी बहुतांश आईवडिलांची इच्छा असते. त्यातल्या काहींची इच्छा पूर्ण होते तर काहींना केवळ आपल्या मुलांनी पाठवलेला पैसा हाच आधार मानावा लागतो. मुला-नातवंडांचा हवाहवासा सहवास, त्यांचा मायेचा स्पर्श मात्र कधीच मिळत नाही.
मुलं आपल्याकडे बघत नाहीत, अशी तक्रार घेऊन वृद्ध आई-बाबा कोर्टात जातात. पण मुलांचं खरं प्रेम आणि काळजी मिळवून देण्यात न्यायालयांचे आदेशही कमी पडतात. म्हातारपणी आपल्यावर आलेल्या या परिस्थितीने अनेक वृद्ध हतबल आणि पराभूत झालेले असतात. पण काही मात्र चांगलेच खमके निघतात. मुलांना धडा शिकवण्याची भूमिका घेतात.
अशीच भूमिका चीनमधील लिऊ या वृद्ध महिलेने घेतली आहे. लिऊ या शांघाय येथे राहतात. एकेकाळी लिऊ आपल्या म्हातारपणाबाबत बिनधास्त होत्या. आपली मुलं आपली काळजी घेतील, याचा त्यांना विश्वास होता. या विश्वासाच्या बळावरच त्यांनी आपलं मृत्यूपत्रही करून ठेवलं. त्यात आपली संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर केली. पण लिऊ यांच्यावर आपल्याच निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ आली.
नोकरी- धंद्यानिमित्त दुसऱ्या शहरात राहणाऱ्या मुलांनी आपल्या वृद्ध आईच्या काळजीबाबत चालढकल करायला सुरुवात केली. मनात आलं तरच आईला भेटणार, पण जेव्हा लिऊ यांची गरज असायची तेव्हा मात्र मुलं पाठ फिरवायची. घरात सोबतीला असलेल्या कुत्री-मांजरांमध्ये मन रमवलं. लिऊ यांचं वरचेवर आजारी पडणं वाढलं. मुलांना कळवूनही ती लिऊ यांना भेटायला येत नसत. हळूहळू त्यांना मुलांचा स्वार्थीपणा उमगत गेला. मुलांच्या नावानं सर्व संपती केल्यावरही मुलं अशी वागतात आणि फक्त जीव लावलेली कुत्री, मांजरं मात्र आपली सावलीसारखी सोबत करतात.
जी मुलं आपलं काही बघतंच नाहीत त्यांंच्यावर का अवलंबून राहायचं असा विचार करून लिऊ यांनी मुलांकडून असलेल्या अपेक्षा सोडून दिल्या. पण, मुलांना त्यांनी माफ मात्र केलं नाही. त्यांनी आपलं इच्छापत्र बदलण्याचं ठरवलं.
नवीन इच्छापत्रानुसार लिऊ यांनी आपल्या मुलांच्या नावावर केलेली संपत्ती रद्द करून ती आपल्यासोबत राहणाऱ्या आपल्या लाडक्या कुत्र्या, मांजरांच्या नावावर करायचं ठरवलं. लिऊ यांनी २.८ मिलियन डाॅलर्स (२३ कोटी २४ लाख, ६३ हजार रुपये) ‘मुलांपेक्षा हेच बरे’ म्हणत कुत्र्या, मांजराच्या नावाने केले. आपल्या या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी मोठा मोबदला देऊन स्थानिक वेट क्लिनिकवर सोपवली. भविष्यात ही कुत्री, मांजरं मेल्यावर त्यांच्या पिल्लांसाठी हे पैसे वापरले जावे असं लिऊ यांनी आपल्या बदललेल्या इच्छापत्रात म्हटलं आहे. लिऊ यांच्या निर्णयाची ही बातमी त्यांच्या घराबाहेर वेगाने पसरली. लोक चर्चा करू लागले. म्हातारपणात लिऊवर ही काय परिस्थिती आली, असं काहींचं म्हणणं होतं तर काहींना लिऊ यांनी आपल्या मुलांबाबत घेतलेली भूमिका पटली होती.
लिऊ यांचा हा निर्णय चीनच्या कायदेशीर चौकटीला मान्य नाही. चीनमधील कायद्यानुसार अशा पद्धतीने इच्छापत्रात आपली संपत्ती थेट पाळीव प्राण्यांच्या नावावर करता येत नाही. बीजिंगमधील इच्छापत्र नोंदणी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी लिऊ यांना कायदेशीर सल्ला दिला आहे. लिऊ यांनी आपल्या विश्वासातील व्यक्तीला नेमून सदर वेट क्लिनिक त्यांच्या कुत्र्या, मांजरांची नीट काळजी घेतंय का, यावर लक्ष ठेवण्यास
सांगावं. वेट क्लिनिकच्या हातात थेट एवढे पैसे सोपवण्यात धोका असल्याची कल्पना लिऊ यांना देण्यात आली आहे.
शिवाय दरम्यानच्या काळात मुलांच्या मानसिकतेत बदल झाला, त्यांनी त्यांची चांगली काळजी घेतली तर लिऊ यांनी आपल्या इच्छापत्रात बदल करण्याची शक्यताही ठेवावी, असा सल्ला अधिकाऱ्यांनी लिऊ यांना दिला आहे.
पण मुलांच्या वागण्याने दुखावलेल्या लिऊ मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगतात.