कोलकाता, दि. 28 - कुत्र्यांचं माणसांवरील असलेलं प्रेम तसं काही नवं नाही...इंटरनेटवर रोज असे लाखो व्हिडीओ पहायला मिळतात ज्यामध्ये कुत्रा आपल्या मालकावर प्रेम करताना दिसत असतो. अनेकदा आपल्या पिल्लांप्रमाणे मालकाच्या लहान मुलांची काळजी घेतानाही दिसतो. मात्र भटक्या कुत्र्यांचा प्रश्न येतो तेव्हा मात्र लोकांचं हे प्रेम पुर्णपणे लपतं. पण त्यांच्यातही तितकीच माणुसकी लपलेली असते हे सिद्ध करणारी एक घटना समोर आली आहे. कोलकातामधील हावडा स्टेशनवर बेवारस पडलेल्या एका सहा वर्षांच्या चिमुरडीचं संरक्षण करण्यासाठी स्थानकावरील सर्व कुत्रे एकत्र आले होते. एकाप्रकारे या श्वानांनी माणुसकीचं दर्शनच घडवलं आहे.
स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्याचं हे बाळ प्रतिक्षा कक्षाबाहेरील बेंचवर कोणीतरी सोडून गेलं होतं. बेवारसपणे त्या बेंचवर पडलेल्या बाळाकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नव्हता. हजारो प्रवासी त्या बेंचजवळून गेले, मात्र एकालाही त्या बाळाकडे लक्ष देण्याची गरज भासली नाही. स्थानकावर उपस्थित असणा-या महिलांपैकी कोणाचं तरी बाळ ते असावं असा अंदाज बांधत प्रत्येक प्रवासी तेथून निघून जात होता. त्या बाळाच्या बाजूला दुधाची अर्धी बाटली आणि डायपर ठेवण्यात आले होते.
जेव्हा माणुसकी आपल्या सामानासोबत ठेवून प्रवासी निघून जात होते तेव्हा स्थानकावरील भटके कुत्रे मदतीसाठी पुढे आले. स्थानकावरील भटक्या कुत्र्यांनी त्या बाळाभोवती गराडा घातला आणि संरक्षण केलं. कुत्रे एका ठिकाणी का जमले आहेत या उत्सुकतेने एक आरपीएफ कॉन्स्टेबल तिथे पोहोचला आणि हे सर्वजण या बाळाचं संरक्षण करत असल्याचं पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. यानंतर त्याने तात्काळ आरपीएफ बूथला माहिती दिली. माहिती मिळताच अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस अधिकारी मिहीर दास यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बाळाला रुग्णालयात दाखल केलं आहे. यानंतर बाळाला चाईल्डलाईन सदस्यांकडे सोपवण्यात आलं. हे तस्करीचं प्रकरण नसून व्यवस्थितपणे प्लान करुन बाळाला स्थानकावर सोडण्यात आल्याचं मिहीर दास यांनी सांगितलं आहे.
याआधी नोव्हेंबर 2016 मध्येही अशाच प्रकारची घटना पहायला मिळाली होती जेव्हा एका सात दिवसांच्या बाळाला कचराकुंडीत सोडून देण्यात आलं होतं. यावेळी कावळ्यांचा हल्ला रोखण्यासाठी कुत्र्यांनी त्या बाळाचं संरक्षण केलं. जोपर्यंत तिची सुटका झाली नाही तोपर्यंत त्यांनी आपली जागा सोडली नव्हती.