ग्लास्गो: फेसबुकवर अवैधपणे आपल्या स्पर्मची जाहिरात देऊन 22 मुलांचा पिता झाल्याचा आरोप एका व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे. ग्लास्गोमध्ये राहणाऱ्या 39 वर्षीय व्यक्तीनं त्याच्यावर झालेले हे आरोप मान्य केले आहेत. ज्या महिलांना मुलं हवं असतं, मात्र त्यांना ते होत नाही, अशा महिलांना मी घरी बोलावून स्पर्म द्यायचो, अशी कबुली अँथनी फ्लेचरनं (नाव बदललं आहे) दिली आहे. यासाठी कोणत्याही महिलेकडून पैसे घेतले नसल्याचंही आरोपीनं सांगितलं. 'द सन'नं दिलेल्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील जवळपास 50 महिलांना स्पर्म डोनेट केल्याची माहिती अँथनी फ्लेचरनं दिली. या महिला मातृत्त्वासाठी आसुसलेल्या होत्या, असंही त्यानं सांगितलं. '5 वर्षांपूर्वी मला याबद्दलची प्रेरणा मिळाली. त्यानंतर मी महिलांना मोफत स्पर्म देऊन त्यांची मदत करु लागलो. मुलं होऊ न शकलेल्या महिलांना सहाय्य करण्याचं काम मी केलं,' असं अँथनी यांनी सांगितलं. फ्लेचरचं हे कृत्य अतिशय गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सुरुवातीला फ्लेचरनं एका क्लिनिकच्या मदतीनं कायदेशीरपणे स्पर्म डोनेट करण्यास सुरुवात केली. स्पर्म डोनेशनमधून जन्मणाऱ्या मुलाला त्याच्या वडिलांची ओळख त्यानं वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यावरच सांगितली जाते. त्यामुळेच फ्लेचरनं स्पर्म फेसबुकवरुन डोनेट करण्यास सुरुवात केली. इंग्लंडमध्ये ह्युमन फर्टिलायजेशन अँड ऍम्ब्रायॉलजीच्या परवानगीशिवाय स्पर्म डोनेट करता येत नाही. मात्र फ्लेचरनं या नियमाचं उल्लंघन केलं. त्यानं स्पर्म डोनेशनसाठी फेसबुकचा आधार घेतला 'मी एक सक्रीय आणि अनुभवी स्पर्म डोनर आहे. मी ग्लास्गोपासून काही मैल अंतरावर राहतो. मी आताही महिलांना गर्भवती होण्यास मदत करु शकतो. तसं करण्यातून मला आनंदच मिळतो,' असं फ्लेचरनं फेसबुकवर लिहिलं होतं. मी यासाठी पैसे घेत नसल्याचंही त्यानं नमूद केलं होतं.
फेसबुकवर 'विकी डोनर'; स्पर्म डोनेट करून 'तो' झाला २२ मुलांचा बाप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 10:55 AM