अंतराळाबाबत आवड असणाऱ्या लोकांसाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे. गेल्या 50,000 वर्षात जे घडलं नाही, ती गोष्ट लवकरच घडणार आहे. यूर्याकडून येणारा एक मोठा धूमकेतू पृथ्वीच्या अतिशय जवळून जाणार आहे. पृथ्वीवरील लोक हा धूमकेतू उघड्या डोळ्यांनी पाहू शकतील. येत्या 1 फेब्रुवारीला हा पृथ्वीवरून जाण्याची शक्यता आहे. तुम्ही दुर्बिणीच्या मदतीने किंवा उघड्या डोळ्यांनी हा धूमकेतू पाहू शकता.
पण, यात एक मोठी अडचण येऊ शकते. जर त्या दिवशी पूर्ण चंद्र निघाला, तर हा धूमकेतू पाहणे अवघड आहे. हा धूमकेतू अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील झ्विकी ट्रान्सिअंट फॅसिलिटीने शोधला होता. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्यांनी पहिल्यांदा हा धूमकेतू गुरू ग्रहाजवळून जाताना पाहिला होता. यानंतर धूमकेतूला C/2022 E3 (ZTF) असे नाव देण्यात आले. पॅरिस वेधशाळेतील खगोलशास्त्रज्ञ निकोलस बिव्हर म्हणतात की, हा धूमकेतू बर्फ, वायू आणि खडकांपासून बनला असून, यातून हिरवा प्रकाश बाहेर पडेल.
धूमकेतू खूप तेजस्वी असेल
एका अंदाजानुसार, या धूमकेतूचे व्यास 1 किलोमीटर आहे. पण, हा NEOWISE (उघड्या डोळ्यांनी दिसलेला अखेरचा धूमकेतू) पेक्षा छोटा असेल. हा धुमकेतू मार्च 2020 मध्ये पृथ्वीजवळून गेला होता. तर यापूर्वी 60 किलोमीटर व्यास असलेला Hale-Bopp धूमकेतू 1997 मध्ये पृथ्वीजवळून गेला होता. आता दिसणारा धुमकेतू आकाराने लहान असला तरीदेखील याची चमक इतरांपेक्षा जास्त असेल. उत्तरी गोलार्धात राहणाऱ्या लोकांना सकाळी हा धुमकेतू दिसेल.
अंदाजानुसार, हा धूमकेतू Oort Cloud मधून येत आहे. सूर्यमालेच्या सभोवतालचा एक विशाल प्रदेश, जो रहस्यमय बर्फाळ वस्तूंनी भरलेला आहे. हा धुमकेतू शेवटचा पृथ्वीच्या जवळून गेला होता, तेव्हा तो पॅलेओलिथिक काळ होता. खगोलशास्त्रज्ञ जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमधून अतिशय स्पष्टपणे हा धुमकेतू पाहू शकतील.