ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १ - दोन दिवसांपासून वाचायला वृत्तपत्र न मिळाल्याने गुजरातमधील एका आयपीएस अधिका-याने निवासस्थानी ड्यूटीवर असलेल्या १७ पोलिस कर्मचा-यांना गॅरेजमध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले असून संबंधीत अधिका-याने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
दोन वर्ष केंद्र सरकारमध्ये काम केल्यावर आयपीएस अधिकारी विजॉय आता पुन्हा गुजरातमध्ये परतले आहेत. सध्या गुजरात पोलिसांच्या तांत्रिक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. विजॉय यांच्या सरकारी निवासस्थानी गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्र आले नव्हते. पत्नीच्या सांगण्यावर निवासस्थानी ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचा-यांना धडा शिकवण्यासाठी विजॉय यांनी बुधवारी १७ जणांना तब्बल १२ तासांहून अधिक वेळ गॅरेजमध्ये डांबून ठेवले होते. याप्रकरणी दोघा पोलिसांनी पोलिस महासंचालकांकडेही तक्रार केली आहे. गॅरेजमध्ये वीज, पाणी कसलीच सोय नव्हती. बुधवारी रात्री उशीरा या प्रकाराची माहिती अन्य पोलिस अधिका-यांना मिळाल्यावर या सर्वांची गॅरेजमधून सुटका करण्यात आली. या परिसरातील वरिष्ठ पोलिस अधिका-याने विजॉय यांची पाठराखण केली आहे. विजॉ़य यांना कर्मचा-यांना शिस्तपालन शिकवायची होती असे एका पोलिस अधिका-याने सांगितले. मात्र किरकोळ कारणावरुन पोलिस कर्मचा-यांना डांबून ठेवणा-या आयपीएस अधिका-यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.