खोदकाम करताना क्षणार्धात बदलले मजुराचे नशीब, खाणीत सापडला मोल्यवान हिरा, किंमत तब्बल ६० लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 12:29 PM2021-12-07T12:29:04+5:302021-12-07T12:30:53+5:30
Jara Hatke News: मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका गरीब मजुराला सोमवारी कृष्णा कल्याणपूरच्या एका उथळ हिरा खाणीमध्ये १३ कॅरेटचा एक मोठा हिरा सापडला. या हिऱ्याची किंमत तब्बल ६० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
भोपाळ - देव देतो तेव्हा भरभरून देतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका गरीब मजुराला आला. या मजुराला सोमवारी कृष्णा कल्याणपूरच्या एका उथळ हिरा खाणीमध्ये १३ कॅरेटचा एक मोठा हिरा सापडला. या हिऱ्याची किंमत तब्बल ६० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा हिरा सापडल्यानंतर मजुराच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. एवढेच नाही तर आज सहा अन्य हिरेही सापडले आहे. त्यामुळे कालचा दिवस पन्नासाठी डायमंड डे ठरला. पन्नाच्या भूमीमधून नेहमीच सुंदर हिरे सापडतात. संपूर्ण जगामध्ये सुंदर क्वालिटीचे जेम हिरे येथेच सापडतात.
सोमवारी आदिवासी शेतकरी मुलायम सिंह याला १३ कॅरेटचा हिरा सापडला. हा हिरा पाहून या शेतकऱ्याचे डोळेच विस्फारले. आता त्याच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. आता हा हिरा विकून मिळणाऱ्या पैशांमधून मुलांना शिकवणार असल्याचे मुलायम सिंह याने सांगितले.
मुलायम सिंह याला सापडलेल्या हिऱ्याबाबत हिऱ्याची पारख करणारे जवाहिर अनुपम सिंह यांनी सांगितले की, हा सर्वोत्तम दर्जाचा हिरा आहे. तो पुढच्या लिलावामध्ये ठेवण्यात येईल. त्यांनी सांगितले की, आज जे हिरे सापडले आहेत, त्यांची किंमत लाखो रुपये आहे. हे हिरे १३.५४ कॅरेट, ६ कॅरेट, ४ कॅरेट, ४३ सेंट, ३७ सेंट आणि ७४ सेंटचे आहेत. त्यांची किंमत सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत असू शकते.
अनुपम सिंह यांनी सांगितले की, या हिऱ्यांची वास्तविक किंमत लिलावावेळीच कळेल. मात्र ज्या पद्धतीने आज हिरे सापडले आहेत, ते पाहता गरीब लोक खूश आहेत. कारण त्यामुळे त्यांचे भविष्य बदलले आहे. १३ कॅरेटचा हिरा शोधणारा मजूर मुलयम सिंह याला किती पैसे मिळतील, असे विचारले असता हिरा कार्यालयाने सांगितले की, जेव्हा हिऱ्याचा लिलाव होईल, तेव्हा जो पैसा येईल, त्यातील १२ टक्के रक्कम कापून सर्व पैसे मुलायम सिंह याला दिले जातील. जर हिऱ्याचा ६० लाख रुपयांना लिलाव झाला तर मुलायमला ५२.८० लाख रुपये मिळतील.