काठमांडू : २५ एप्रिल रोजी नेपाळला बसलेल्या भीषण भूकंपाच्या धक्क्यात हजारो लोकांचा बळी तर गेलाच; पण त्याचबरोबर शिखर मानल्या जाणाऱ्या एव्हरेस्टची उंचीही २.५ सें.मी.ने कमी झाली आहे. उपग्रहांच्या माहितीचे हे विश्लेषण आहे. भूकंपानंतर प्रथमच उपग्रहावरून घेतलेल्या माहितीनुसार काठमांडूजवळील जमीन १ मीटरने उंच झाली आहे, त्यामुळेच काठमांडूचे जबर नुकसान झाले. उपग्रहांनी दिलेल्या याच माहितीवरून माऊंट एव्हरेस्टची उंची थोडी कमी झाल्याचे कळले, असे लाईव्ह सायन्सचे वृत्त आहे. युरोपच्या सेंटिनल -१ ए या रडार उपग्रहाने ही माहिती दिली आहे. सेंटिनलची माहिती मिळविण्यासाठी शास्त्रज्ञांची स्पर्धा चालू आहे. हा उपग्रह गेल्या आठवड्यात नेपाळवरून गेला. त्यानंतर काही तासात ही माहिती मिळाली आहे. या भूकंपात भारताचा प्रतल (टेक्टॉनिक प्लेट) काठमांडूच्या प्रतलाखाली गेला असून त्यामुळे काठमांडूची जमीन एक मीटरने उंच झाली आहे. २५ एप्रिलला ७.९ तीव्रतेचा धक्का नेपाळला बसला असून, त्यातील मृतांची संख्या ७,७०० पर्यंत पोहोचली आहे. (वृत्तसंस्था)
भूकंपाने एव्हरेस्टची उंची घटली; उपग्रह माहिती
By admin | Published: May 08, 2015 1:15 AM