खरे तर आपल्या उत्सवांना अनेक वर्षांची परंपरा आहे. या उत्सवांचे नाते मुळातच संस्कृती आणि निसर्ग यांच्याशी घट्टपणे जोडले गेलेल आहे. काही वर्षांपूर्वी सण उत्सवांतील आनंद हा कौटुंबिक आणि सामाजिक एकात्मतेशी निगडित होता, पण विशेषत: नव्वदच्या दशकात झालेली संगणकीय क्रांती, इलेक्ट्रॉनिक जगतातील विलक्षण प्रगती याने साऱ्या जगाच्या सीमारेषा पुसल्या गेल्यात. वास्तविक पाहता, या प्रगतीमुळे मानवी जीवनातील सुसंवाद वाढणे अपेक्षित होते, पण या प्रगतीच्या रेट्यामुळे जीवनातील गती वाढली आणि सांस्कृतिक मूल्यांची पडझड होत गेली. त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न समोर येऊ लागल. मग काही वर्षांपूर्वी निसर्गाशी नाते जोडत साजरे केले जाणारे सण, उत्सव हे निर्सगाशी विसंगत साजरे होऊ लागले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा व्यापक जगजागृती आवश्यक असल्याचे लक्षात आले.आपण जर तीन दशकांपलीकडे जाऊन पाहिले, तर भारतीय वार्षिक सण, उत्सवाच आणि निसर्गाचे घट्ट नाते होते. श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या प्रत्येक उत्सवाकडे बारकाईने पाहिल्यास, आपल्याला याचे महत्त्व समजू शकेल, पण गेल्या काही वर्षांपासून उत्सव साजरा करण्याच्या उत्साहात आपण निसर्गाला हानी पोहोचवू लागलो आहोत. या बदलत्या उत्सवाचे उदाहरण म्हणजे, साजरा होणारा गणेशोत्सव. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक प्रबोधनासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. तत्पूर्वी घरगुती गणेशोत्सव हा नित्यवर्षी साजरा केला जातच होता. या वेळी गणेशाची मूर्ती ही शाडूच्या मातीची पूजली जात होती, पण त्याची जागा प्लास्टर आॅफ पॅरीसने घेतली आणि प्रदूषणाच्या प्रश्नाला सुरुवात झाली. वास्तविक पाहता, प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेशमूर्ती विसर्जित केल्यानंतर, त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत अडवले जातात. कारण प्लास्टर आॅफ पॅरीसची मूर्ती पाण्यात न विरघळता, त्याचा दगड होतो. त्याचबरोबर, या मूर्तीला दिलेल्या रासायनिक रंगातून मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. याच्या जोडीला गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डॉल्बी साउंडच्या खणखणाटाने निर्माण होणारे ध्वनिप्रदूषण ही आणखी एक समस्या आहे.या सर्व प्रश्नांकडे पाहिल्यास हे सर्व प्रश्न मानवनिर्मित आहेत. गणराया गजानन म्हणजे बुद्धिदेवता, शक्तिदेवता आणि सामर्थ्यदेवता म्हणून गणली जाते. संत ज्ञानदेवांनी ओम नमोजी आद्या या श्लोकातून गणरायला वंदन करून ओमकार रूपाचे स्मरण केले होते. मग अशा चौदा विद्या, चौसष्ट कलांच्या अधिपतीचे नाते समृद्ध, निसर्गाशी घट्ट करण्यासाठी आपण डोळसपणे या उत्सवाकडे पाहायला हवे. याबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या आठ-नऊ वर्षांपासून विशेष प्रयत्न केले आहेत. केवळ कायद्याच्या बंधनातून प्रदूषण नियंत्रणावर नियंत्रण मिळवणे हे अशक्यप्राय आहे. त्याकरिता सर्वसामान्य नागरिकांच्या व्यापक मानसिकतेत बदल करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच महाराष्ट्र नियंत्रण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अग्रगण्य वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या, रेडिओ वाहिन्या यांच्या सहकार्याने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. गेल्या दशकभरातील सर्वसामान्य नागरिकांचा पर्यावरणस्नेह गणेशोत्सवाचा प्रतिसाद विलक्षण गतिमान होत आहे. या उपक्रमांकरिता राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, पर्यावरण राज्यमंत्री मा. ना. प्रवीण पोटे यांचं मार्गदर्शन, तर मंडळाचे अध्यक्ष तथा पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पी. अनबलगन यांचा पाठिंबा याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जनजागृतीपर उपक्रमास चांगली चालना मिळाली आहे.आठ ते नऊ वर्षांपूर्वी इ$कोफ्रेंडली गणपती ही संकल्पना फारशी रुजली नव्हती, पण गेल्या तीन वर्षांत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढू लागली आहे. बाजारात आर्थिक उलाढालीच्या नियमाप्रमाणे मागणी तसा पुरवठा, या पद्धतीने पेणसारख्या गणपतीचे माहेरघर असणाऱ्या तालुक्यात अनेक कारखानदार शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार करू लागले आहेत. गेल्या तीन वर्षांचा एकूण अंदाजे आढावा घेतल्यास, पेणमधील अनेक मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचे कारण मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरात ते अगदी परदेशापर्यंत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची मागणी वाढू लागली आहे. त्याचबरोबर, इकोफ्रेंडली डेकोरेशनदेखील आज बाजारात मोठ्या उपलब्ध आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सात वर्षांत विविध जनजागृतीपर उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, याकरिता व्यापक जनजागृती मोहीम राज्यातील अग्रगण्य वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या यांच्या माध्यमातून आयोजित केली जात आहे.त्याबरोबर, राज्यातील दोनशे पन्नास डिजिटल सिनेमा थिएटर्समध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जगजागृतीचे संदेश नामवंत चित्रपट कलावंताच्या सहकार्यातून प्रसारित केले जात आहेत. या पाच वर्षांच्या जनजागृतीपर अथक प्रयत्नातून आज मुंबईसारख्या शहरात, राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरात किंवा ग्रामीण भागात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची प्रचंड मागणी वाढत आहे. या वर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने श्रीगणेश कला केंद्र, गणगौरव आर्ट्स, पर्यावरण दक्षता मंच, मंगलमूर्ती डॉट कॉम, ई-गणेशा अशा काही सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून मुंबई शहर व आजूबाजूच्या परिसरात किमान एक लाखापेक्षा जास्त घरगुती गणेशमूर्ती उपलब्ध होतील, असा प्रयत्न केला आहे व याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. याचाच अर्थ, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मानसिकता आपल्या सर्वांकडे आहे, पण त्याकरिता आपण मनापासून निश्चय करणे गरजेचे आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची उपलब्धता लक्षात घेऊन, लोकसहभागातून मंडळाने जास्तीत जास्त पुढाकार घेऊन ही मागणी पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. कोणताही प्रश्न मांडण्यापेक्षा तो सोडविण्यासाठी सकारात्मक भावनेतून काम केल्यास त्याला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या वतीने विविध सामाजिक जनजागृतीपर उपक्रमाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात आहे. याला लोकांचा मिळणारा भरघोस पाठिंबा, हेच या चळवळीचे यश मानायला हवे.
इकोफ्रेंडली गणेशोत्सव वृद्धिंगत होतोय!
By admin | Published: September 15, 2016 3:21 AM