मृत्यू झाल्यानंतरही व्यक्ती जिवंत झाल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. अशाच प्रकारची घटना एका महिलेसोबत घडली. हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाला. घरातील लोकांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली, मृत महिलेला शवपेटीमध्ये ठेवण्यात आले. पण, काही वेळानंतर शेवपेटीतून आवाज आला. ही धक्कादायक घटना इक्वाडोअरच्या बाबाहोयो येथील आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या शुक्रवारी बाबाहोयो येथे 76 वर्षीय बेला मोंटोया यांचा हृदयविकाराच्या घटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. अखेर शोक आवरत त्यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. पण, यावेळी अचानक दैवी चमत्कार घडला. महिलेला काही वेळातच दफन केले जाणार होते, पण अचानक शेवपेटीतून तिचा आवाज आला.
कुटुंबीयांनी शेवपेटी उघडून पाहिली असता ती महिला जिवंत असल्याचे दिसले. ज्या महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते, ती महिला उठून उभी राहिली. विशेष म्हणजे, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित करुन मृत्यू प्रमाणपत्रदेखील दिले होते. सर्टिफिकेटमध्ये महिलेच्या मृत्यूचे कारण कार्डिओरेस्पीरेटरी अरेस्ट असल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इक्वाडोअरच्या आरोग्य मंत्रालयाने या महिलेला मृत घोषित कसे केले, याची चौकशी करण्यासाठी एक पथक नेमले आहे.