जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना परिस्थितीमुळे भीक मागून दोन वेळचं जेवण मिळवावं लागतं. पण इजिप्तमधील एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुम्ही थक्क व्हाल. येथील एका भीक मागणाऱ्या महिलेच्या बॅंक अकाऊंटमध्ये तीन मिलियन इजिप्शिअन पाउंड(भारतीय करन्सीनुसार १ कोटी ४२ लाख रूपये) जमा असल्याचं समोर आलं आहे. सोबतच अशीही माहिती मिळाली की, या ५७ वर्षीय महिलेच्या नावावर ५ घरेही आहेत.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, महिला व्हीलचेअवर बसून रस्त्यावर भीक मागत होती. पण पोलिसांना चौकशीत आढळून आलं की, महिला केवळ भीक मागण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करते. कारण अनेकांनी तिला स्वत:च्या पायावर चालताना बघितलं आहे. ती इजिप्तच्या अनेक राज्यांमध्ये फिरून भीक मागत होती.
या महिलेचं नाव नफीसा सांगितलं जात आहे. चौकशीदरम्यान पोलिसांना असंही आढळून आलं की, महिला कोणत्याही आजाराने पीडित नाही. ती पूर्णपणे बरी आहे. या महिलेचे दोन बॅंक अकाऊंट आहेत. ज्यात १ कोटी ४२ लाख रूपये रक्कम जमा असल्याची माहिती मिळाली. त्यासोबतच या महिलेच्या नावावर ५ घरं आहेत. महिलेला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे.