बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये अलास्कन मलामूट या प्रजातीची कुत्री अचानक चर्चेत आली आहे. ही कुत्री हरवली असून मालकाने केलेल्या दाव्यानुसार तिची किंमत तब्बल 8 कोटी आहे. मालकाने ही कुत्री शोधून देणाऱ्यास बक्षीस म्हणून घसघशीत रक्कमही जाहीर केली आहे. तसेच हनुमंतनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रारही केली आहे.
बेंगळुरूमध्ये बनशंकरी येथे राहणाऱ्या सी सतीश यांनी दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांनी चीनमधून ही कुत्री खरेदी केली होती. त्यांनी ही कुत्री एका करारानुसार बेंगळुरूमध्येच राहणाऱ्या सौम्या यांच्याकडे सोपविली होती.
या समझोत्यानुसार पिल्ले झाल्यानंतर एक पिल्लू सौम्या यांच्याकडेच ठेवून कुत्री व अन्य पिल्ले परत मूळ मालकाला सोपविण्यात येणार होती. सतीश यांनी सांगितले की, सौम्या यांच्या कुटुंबाने ही अट मान्य केली होती. या कारणामुळेच आम्ही कुत्रीला सोपविले होते. या जातीच्या एका पिल्लाची किंमत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असते.
यावेळी सतीश यांनी सांगितले की, मी आसपासच्या कुत्र्यांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना संपर्क केला आहे. मात्र, त्यांच्याकडून या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने या प्रजातीची किंमत विचारली होती.