एका 88 वर्षीय वयोवृद्धाने आपल्या सगळी प्रॉपर्टी फळं विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर केली. त्याच्या फ्लॅटची किंमत 3.84 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. व्यक्तीच्या निर्णयामुळे त्याच्या परिवारातील लोकांना चांगलाच धक्का बसला. जेव्हा यामागचं कारण समोर आलं तेव्हा वृद्ध व्यक्तीलाच योग्य ठरवण्यात आलं. ही घटना चीनच्या शांघायमधील आहे. इथे मा नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने 3 वर्षाआधी असा निर्णय घेतला होता की, तो त्याची पूर्ण प्रॉपर्टी फळं विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर करेल. ज्याच्यासोबत त्याचं रक्ताचं नातंही नाही. हे सगळं त्याने त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, फळं विकणाऱ्या व्यक्तीचं नाव लियु आहे. त्याच्या नावावर मा ने आपली प्रॉपर्टी केली कारण त्याने या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूआधी काही वर्ष काळजी घेतली होती. काही वर्षाआधी लियु आपली पत्नी आणि तीन मुलांसोबत मा याच्या घरी रहायला आला होता. त्याने आणि त्याच्या परिवाराने मा यांची काळजी घेतली.
31 डिसेंबर 2021 ला वृद्ध व्यक्तीचं निधन झालं. तेव्हा त्याच्या तीन बहिणींनी बॅंक अकाऊंट सर्टिफिकेट लियुला देण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या की, त्यांच्या भावाच्या संपत्तीवर त्यांचा अधिकार आहे. यानंतर लियुने कोर्टात धाव घेतली. मा यांच्या तीन बहिणींचं म्हणणं आहे की, त्यांच्या वृद्ध भावाने मृत्यूआधी 2020 मध्ये लियुसोबत एका करारावर सही केली होती. ज्यात लिहिलं होतं की, जिवंत असेपर्यंत लियु त्यांची देखरेख करेल आणि मृत्यूनंतर त्यांची सगळी संपत्ती लियुला मिळेल.
बहिणींनी दावा केला की, मा यांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. त्यांना विसरण्याची समस्या होती. अशावेळी त्यांच्या कागदपत्रावर हस्ताक्षर करून घेण्यात आले. पण नोटरी अधिकाऱ्यांनी परिवाराचा दावा फेटाळला. ते म्हणाले की, वृद्ध व्यक्तीची मानसिक स्थिती पूर्णपणे चांगली होती.
या महिन्यात बाओशान कोर्टाने यावर निर्णय दिला. न्यायाधीश म्हणाले की, अग्रीमेंट कायदेशीर आहे आणि आदेश दिला की, मा यांचं घर आणि पैसा सगळं लियुला देण्यात यावं. रिपोर्टनुसार, लियु हा मा यांच्या घराजवळ फळं विकत होता. मा यांच्या एकुलत्या एका मुलाचा मृत्यू मानसिक आजारामुळे झाला होता. अशात लियु हाच त्यांची काळजी घेत होता. मा यांच्या नातेवाईकांकडील कुणीही त्यांच्या मुलाच्या अंत्यसंस्काराला आले नव्हते. जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही त्यांना भेटायला कुणी आलं नव्हतं. तेव्हा त्यांच्यासोबत फक्त लियु होता.