Electricity with Dates: संत कबीर यांचा एक दोहा आहे की, 'बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर'. यात संत कबीर म्हणतात की खजुरासारखी झाडे जरी मोठी असली तरी ती प्रवाशांना सावली देण्याच्या कामीही येत नाहीत आणि त्यांची फळेही सहजासहजी मिळत नाहीत. मात्र या खजुरांच्या मदतीने तीन अभियंत्यांनी चमत्कार घडवला आहे. खजुरांपासून त्यांनी वीजनिर्मिती करून दाखवली आहे. युएईमधील या अभियंत्यांनी आणि कलाकारांच्या गटाने वीज निर्मितीसाठी वापरलेला खजूर हा पारंपारिक खजूर आहे आणि तो त्याच्या उपयुक्त गुणधर्मांसाठी ओळखला जातो. हा प्रयोग कोणी आणि कसा केला ते जाणून घेऊया.
तिघांनी मिळून केला आश्चर्यकारक प्रयोग
या नव्या शोधाचे श्रेय तीन जणांना जाते. त्यांची नावे आहेत- डॉ. अल अत्तार, ओमर अल हम्मादी आणि मोहम्मद अल हम्मादी. हे तिघेही मेडजूल खजूर (Medjool dates) वापरत. 'खजूरांचा राजा' असलेला मेडजूल खजुर हा मूळचा मोरोक्को असून तो अमेरिकेच्या उबदार प्रदेशात तसेच मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियाच्या काही भागांमध्ये आढळतो. तो त्याच्या गोडव्यासाठी प्रसिद्ध आहे. हा खजूर आकाराने खूप मोठा असतो आणि तांब्याच्या ताटात घट्ट पकड मिळवू शकतो. खजूरामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेचे ऊर्जेत रूपांतर करणे हा या प्रक्रियेचा उद्देश होता.
डॉ. अल अत्तार, ओमर अल हम्मादी आणि मोहम्मद अल हम्मादी यांनी खजुरांमध्ये एम्बेड केलेल्या तांब्याच्या प्लेट्सचा वापर केला, ज्यांना प्रवाहकीय धातूच्या तारांनी जोडलेले होते. मॉडेलसाठी २० खजूर वापरले गेले. कॉपर प्लेट इलेक्ट्रोड म्हणून काम करतात तर धातूच्या तारा सर्किट पूर्ण करतात, ज्यामुळे सेटअप कमी प्रमाणात वीज निर्माण करू शकला.
त्यांच्या निर्मितीमागील प्रेरणा स्पष्ट करताना मोहम्मद अल हमादी म्हणाले की, स्थानिक अरब संस्कृतीत खजुरांना खूप महत्त्व आहे. पण आजच्या वेगवान जगात, त्यांचे महत्त्व कधीकधी दुर्लक्षित केले जाते. खजुरांची उपयुक्तता दाखवण्यासाठी हा प्रयोग करण्याची कल्पना सुचली. तिन्ही लोकांनी सिक्का आर्ट अँड डिझाईन फेस्टिव्हलमध्ये त्यांचे हे प्रोजेक्ट दाखवले. तसेच, शाश्वत ऊर्जा उपायांचा प्रचार करताना खजुरांच्या सांस्कृतिक महत्त्वाकडे लोकांचे लक्ष वेधले.