मुंबई- तुम्ही कधी हत्तीला स्मोकिंग करताना पाहिलंय? बघणं तर दूरच आपण या कल्पनेचा साधा विचारही करू शकत नाही. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमध्ये एक हत्ती आपल्या सोंडेतून धूर काढताना दिसतो आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलंच शेअर केलं जातंय.
48 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. यामध्ये हत्ती जंगलातील जळालेल्या जमिनीवरील काहीतरी वस्तू उचलून तोंडात टाकताना दिसतो आहे. त्यामुळे हत्तीच्या तोंडातून धूर येताना पाहायला मिळतो आहे. सिगारेट ओढल्यावर ज्याप्रमाणे धूर काढला जातो त्याच प्रमाणे हा धूर निघताना दिसतो आहे. तपासणीनंतर हत्ती जमिनीवरील कोळश्याचा तुकडा तोंडात टाकतो आहे व त्याची राख तोंडात बाहेर काढत असल्याचं समोर आलं आहे.
हा व्हिडिओ कर्नाटकमधील नागरहोल राष्ट्रीय उद्यानातील असून विनय कुमार या वनाधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ काढला आहे. एकदा जंगलातून जात असताना त्यांना हा प्रसंग दिसला आणि त्यांनी तो आपल्या कॅमेरात कैद केला आहे. कोळशात कोणतेही पौष्टीक मूल्य नसतं, पण त्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे अनेकदा प्राणी त्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे जंगलात लागलेली आग यानंतर तयार झालेली राख प्राणी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.