जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती कोण, असं विचारलं तर अनेकांना याबाबत माहिती नसते. मात्र, रोमेनियाच्या डुमित्रू कोमेनेस्कु यांच्यानंतर आता जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती होण्याचा मान प्युर्टो रिको येथे राहणाऱ्या एका आजोबांना मिळाला आहे. जगातील सर्वांत वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून याची घोषणा करण्यात आली आहे. (emilio flores marquez confirmed as the world oldest man living at 112)
जगातील सर्वांत वयस्कर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या या व्यक्तीचे नाव एमिलियो फ्लोर्स मार्केझ असे आहे. प्यूर्टो रिको येथे वास्तव्य असलेल्या मार्केझ यांचा जन्म ऑगस्ट १९०८ रोजी पोप्यूर्टो रिकान राजधानी कॅरोलिना येथे झाल्याचे सांगितले जात आहे.
एमिलियो फ्लोर्स मार्केझ यांचं वय किती?
एमिलियो फ्लोर्स मार्केझ यांचे वय ११२ वर्षे ३२६ दिवस आहे. एमिलियो फ्लोर्स मार्केझ हे आपल्या पालकांचे दुसरे अपत्य असून, त्यांना ११ भावंडं आहेत. आपल्या कुटुंबीयांसोबत त्यांनी ऊसाच्या शेतात काम केले. ते केवळ तीन वर्षे शालेय शिक्षण घेतले आहे. त्यांच्या पत्नी एंड्रिया प्रेज डी फ्लोर्स यांचे सन २०१० मध्ये वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाल्याचे सांगितले जाते.
एक मसीहा नेहमीच आपल्यात जीवंत असतो
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर मार्केझ यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, माझ्या वडिलांनी मला प्रेमाने वाढवले आणि प्रत्येकावर प्रेम करायला शिकवले. त्यांनी नेहमीच मला व माझ्या भावंडांना चांगले कार्य करण्यास सांगितले होते आणि असेही म्हटले होते की, एक ‘मसीहा’ नेहमीच आपल्यात जीवंत असतो, या शब्दांत मार्केझ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, मार्केझ यांच्या आधी रोमेनियाचे रहिवासी असलेल्या डुमित्रू कोमेनेस्कुने सर्वांत वयस्कर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. मात्र, २७ जून २०२० रोजी त्यांचे वयाच्या १११ वर्ष २१९ दिवसांनी निधन झाले. त्यानंतर मार्केझने हा नवीन विक्रम केला आहे.