लंडन - आजच्या घडीला मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण स्मार्टफोनचा वापर करत आहेत. मात्र, एका व्यक्तीला आपल्या मुलाला फोन देणे प्रचंड महागात पडले आहे. Apple iPhone वर असलेला एक गेम खेळताना या मुलाने आपल्या वडिलांना तब्बल सव्वा लाख रुपयांचा चुना लावला आहे. (England Boy plays dragons game on iphone racks up 1 lakh bill dad forced to sell family car)
मुलांचे मोबाइलवर खेळणे सहज गोष्ट आहे. पण त्याने गेम खेळता खेळता आपल्या अकाउंटवरून लाखो रुपयांचे ट्रांझेक्शन केले तर? काहीसा असाच प्रकार घडलाय इग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत. गेमच्या परचेस ऑप्शनचा वापर करत त्यांच्या मुलाने वडिलांच्या अकाउंटमधून एक लाख रुपयांपेक्षाही अधिकचे ट्रांझेक्शन केले.
इग्लंडमध्ये राहणारे मुहम्मद मुतासा यांनी आपला 7 वर्षांचा मुलगा अशाज मुतासाला गेम खेळण्यासाठी आपला आयफोन दिला होता. तो वडिलांच्या आयफोनवर Dragons: Rise of Berk या गेमचे फ्री व्हर्जन खेळत होता. यावेळी त्याने गेम खेळताना जवळपास 1,800 डॉलर (जवळपास 1.3 लाख रुपये)चे बील केले. माध्यमांतील वृत्तानुसार, मोबाइल गेम खेळताना त्याने इन-अॅप खरेदी केली होती. त्याच्या वडिलांना जेव्हा, 1,800 डॉलरचे बील 29 ईमेल रिसीप्टच्या स्वरुपात मिळाले, तेव्हा त्याना या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळाली. Dragons: Rise of Berk गेममध्ये 2.60 डॉलरपासून ते 138 डॉलरपर्यंत इन-परचेस, असे ऑप्शन आहे.
एवढे मोठे Apple iTunes बील आल्यानंतर मुलाच्या वडिलांवर आपली कार विकण्याची वेळ आली. हे बील भरण्यासाठी त्यांनी आपली Toyota Aygo कार विकली. मुहम्मद मुतासा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कस्टमर सर्व्हिस आणि अॅप्पलकडेही यासंदर्भात तक्रार केली. तक्रार करूनही त्यांना केवळ 287 डॉलरच रिफंड करण्यात आले आहेत. मुहम्मद एक डॉक्टर आहेत आणि ते पत्नी फातिमा आणि मुलगा अशाज आणि मुली अरीफा आणि आलिया यांच्यासोबत राहतात.