कोरोना काळात अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला पण असेही काही लोक आहेत की ज्यांचं नशीब रातोरात बदललं. इंग्लंडच्या लीड्स येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसाठी कोरोना काळ आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला आहे. कोरोना महामारीच्या गेल्या एका वर्षात स्टीव्ह पार्किन नावाच्या व्यक्तीच्या संपत्तीत ४५ मिलियन पाऊंड म्हणजेच जवळपास ४५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
वयाच्या १६ व्या वर्षी शाळा सोडल्यानंतर स्टीव्ह पार्किन कोट्यधीश झाले. कोरोना काळात सुपरमार्केटमध्ये स्मशानशांतता पसरली होती. सुपरमार्केट लॉकडाऊनमुळे बंद होते. त्यामुळे ऑनलाइन खरेदीत वाढ झाली आणि स्टीव्ह पार्किन यांचं नशीब पालटलं
स्टीव्ह पार्किन यांनी १९९२ साली 'मॅन विथ ए व्हॅन' नावानं ऑनलाइन लॉजिस्टीक डिलिव्हरी कंपनीची सुरुवात केली होती. कोरोना काळात त्यांच्या कंपनीला चांगली कामं मिळू लागली. कारण ऑनलाइन शॉपिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आणि परिणामी लॉजिस्टिक कंपन्यांची दिवाळीच झाली. पार्किन यांच्या कंपनीच्या मालकीचे आता मोठ-मोठे गोदाम देखील आहेत. पार्किन यांची कंपनी आता मार्क्स अँड स्पेंसर, एएसडीए आणि मॉरिसर सारख्या कंपन्यांचं सामना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते.
स्टीव्ह पार्किस आता यॉर्कशायरच्या श्रीमंतांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांच्या संपत्तीत गेल्या वर्षात ४५० कोटींची वाढ झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार गेल्या वर्षभरात कंपनीच्या व्यवसायात ३९.१ टक्क्यांची वाढ झाली असून जवळपास ७०० कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. तसंच कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील दोन हजारांनी वाढली आहे.
पार्किन यांच्या कंपनीनं जवळपास १० हजार कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आहे. लीड्समध्ये जन्मलेल्या पार्किन हे एका मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आहेत. त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी शिक्षण सोडलं होतं. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच ते ड्रायव्हिंगचं काम करू लागले होते.