ग्वाल्हेर : मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील रिनहाई गावात एका अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अनोखा यासाठी कारण तुम्ही यापूर्वी अशा विवाह सोहळ्याबाबत ऐकले नसेल. हा अनोखा विवाह होता उंट आणि सांडणीचा. कल्लो सांडणीचा विवाह गोपाळ नावाच्या उंटाशी लावण्यात आला. हा विवाह सोहळा पाहण्यासाठी दूरदूरवरून मोठ्या संख्येने लोक आले होते. कल्लो सांडणीचा तिच्या मालकाने एखाद्या मुलीप्रमाणे सांभाळ केला होता. चार वर्षांच्या कल्लोचा दुसऱ्या गावचे रहिवासी लक्ष्मणसिंह यांच्या उंटाशी विवाह झाला. नवरा-नवरीला सजविण्यात आले होते. विवाहासाठी दूरवरून आलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कल्लोचे मालक नरेश रघुवंशी यांनी एक हजार लग्नपत्रिका छापून लोकांना विवाहासाठी आमंत्रित केले होते. कल्लोला भेटीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात रोकड मिळाली. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून या दोघांचे लग्न लावण्यात आले. आता कल्लो चार वर्षांची आहे. मी जेव्हा तिला घेऊन आलो होतो, तेव्हाच मी तिचे लग्न धूमधडाक्यात करण्याचे ठरविले होते, असे कल्लोचे मालक रघुवंशी यांनी सांगितले. उंट आणि सांडणीचा विवाह सोहळ्याचे साक्षीदार बनल्यानंतर सर्वांनी मिष्टान्नावर ताव मारला. हा विवाह सोहळा चर्चेचा विषय बनला आहे.
उंट अन् सांडणीचा अनोखा विवाह
By admin | Published: March 23, 2017 12:56 AM