Fake Doctor : बोगस डॉक्टरांचे अनेक अजब अजब कारनामे नेहमीच समोर येत असतात. काही महाभाग तर असे असतात की, ते भव्य हॉस्पिटल टाकून लोकांची लूट करतात. सामान्यपणे समाजात डॉक्टराला देवदूत मानलं जातं. कारण ते अनेकांना जीवनदान देत असतात. पण काही लोक कोणतंही शिक्षण न घेता लोकांवर उपचार करतात. अशात अनेकांच्या जीवाला धोकाही होतो. अशीच एक घटना समोर आली आहे.
ऑडिटी सेंट्रलच्या एका रिपोर्टनुसार, थायलॅंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे ३६ वर्षीय एका व्यक्तीने डॉक्टर बनून इतक्या लोकांना मूर्ख बनवलं की, अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालं. केवळ नववा वर्ग शिकल्यानंतर तो स्वत:चा सर्जरी करणं शिकला. त्यानंतर गेल्या २० वर्षापासून तो पुरूषांच्या प्रायव्हेटसंबंधी समस्यांची सर्जरी करत होता. दर महिन्यात तो दोन ते तीन ऑपरेशन करत होता आणि यासाठी रूग्णांकडून १२ ते ५० हजार रूपये फी घेत होता.
कसा झाला भांडाफोड?
सेंट्रल थायलॅंडमध्ये आपलं दुकान चालवत असलेल्या या बोगस डॉक्टरचा भांडाफोड झाला. कारण एका रूग्णावर ऑपरेशन केल्यानंतर त्याला भयानक इन्फेक्शन झालं होतं. रूग्णाने याबाबत पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेव्हा एक स्टिंग ऑपरेशन करून पोलिसांनी लोकांची फसवणूक करणाऱ्या या बोगस डॉक्टरला ताब्यात घेतलं. पकडला गेल्यानंतर त्याने सांगितलं की, त्याने मेडिकलचं कोणतंही शिक्षण घेतलं नाही आणि त्याच्याकडे कोणतंही लायसन्स नाही. त्याच्यावर पोलिसांनी अवैध क्लीनिक चालवण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित रूग्णाने देखील त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.