लेकीच्या पतीचा म्हणजेच जावयाच्या आदरातिथ्याला भारतीय कुटुंबांमध्ये विशेष स्थान आहे. देशाच्या प्रत्येक भागात सासरची मंडळी आपल्या क्षमतेपेक्षा जावयाची उत्तम सोय करण्याचा प्रयत्न करतात. असे म्हणता येईल की इतर कोणत्याही नातेवाईकांच्या तुलनेत, पत्नीच्या माहेरी जावयाला विशेष स्थान आहे. अलीकडेच, आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका जावयाच्या स्वागतासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल 173 पदार्थ करण्यात आले.
भीमावरममध्ये ही घटना घडली आहे. शहरातील एक व्यापारी टाटावर्ती बद्री यांनी हैदराबाद येथील रहिवासी असलेला त्यांचा जावई चावला पृथ्वीगुप्त आणि मुलगी श्री हरिका यांना संक्रांत सणानिमित्त आमंत्रित केले आणि त्यांच्यासाठी 173 प्रकारच्या खाद्यपदार्थांची व्यवस्था घरी केली.
सासरे बद्री म्हणाले, "माझी मुलगी श्री हरिका आणि जावई चावला पृथ्वीगुप्त कोविड प्रतिबंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून आमच्या घरी येऊ शकले नाहीत. या दोन वर्षात आम्हाला आमची मुलगी आणि जावयासोबत संक्रांतीचा सणही साजरा करता आला नाही. पण यंदा हा सण आम्ही एकत्र साजरा केला आहे."
टाटावर्ती बद्री यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी गेल्या चार दिवसांपासून हे सर्व 173 प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्याचे काम करत होती. दुसरीकडे, संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, आम्ही आमचा जावई आणि मुलीला आमंत्रित केले आणि त्यांना सर्व पदार्थ देण्यात आले.
बद्रीची पत्नी संध्या यांनी म्हटलं की, जावयासाठी तयार केलेल्या विशेष पदार्थांमध्ये भजी, पुरी, हलवा, पापड, लोणचे, मिठाई, शीतपेये यांचा समावेश आहे. आपल्या माहेरच्या घरी एवढं स्वागत केलेलं पाहून मुलगीही खूप आनंदी होती आणि सगळ्यांनी एकत्र बसून घरी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"