शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

जपानी कुत्र्या-मांजरांच्या अंगावर पंखे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 10:22 AM

युरोपात सध्या उष्णतेच्या लाटांनी अक्षरश: कहर केला आहे. युरोपातील अनेक देशांनी आजवरचा सर्वात कडक उन्हाळा यंदा अनुभवला. त्यामुळे बऱ्याच ...

युरोपात सध्या उष्णतेच्या लाटांनी अक्षरश: कहर केला आहे. युरोपातील अनेक देशांनी आजवरचा सर्वात कडक उन्हाळा यंदा अनुभवला. त्यामुळे बऱ्याच देशांच्या इतिहासात ‘सर्वात उष्ण दिवस’ यावर्षी नोंदवला गेला. याच उष्णतेच्या लाटांमुळे अनेक देशांतील जंगलांना आगीही लागल्या. त्यात अतिशय मोठ्या प्रमाणात निसर्गहानी तर झालीच, पण प्राणी, पक्षी आणि माणसांचाही बळी गेला.

फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, ग्रीस आदी देशांमध्ये लागलेले वणवे आणि आगींमुळे अक्षरश: हजारो, लाखो लोकांना स्थलांतर करावं लागलं. आपलं घरदार, संपत्ती सगळं काही सोडून त्यांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. उष्णतेच्या लाटेमुळे जमिनीतला आणि जंगलातला ओलावा कमी होतो आणि आग वेगानं पसरते. अगदी छोटी आगही नंतर नियंत्रणात आणणं कठीण होतं. याचा अनुभव आता सगळं जगच घेत आहे. गेल्यावर्षी कॅनडामध्ये लागलेले वणवे तर इतके भयानक होते की, त्या धुरातून ढग आणि वादळ तयार झालं. त्यामुळेही अनेक पशु-पक्ष्यांचा जीव गेला.

प्रत्येकजण यावर आपापल्यापरीनं तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो आहे. या संकटात माणसांनी कुठे ना कुठे आपला आसरा शोधला, पण प्राण्यांना मात्र त्यातून बाहेर पडता आलं नाही. ज्या देशांत फारशा आगी लागल्या नाहीत, त्या देशांत उकाड्यानं मात्र साऱ्यांचीच परीक्षा पाहिली. याच उष्णतेमुळेही अनेक प्राणी मृत्युमुखी पडले. जपानमधील एका कंपनीनं यावर एक नवाच उपाय शोधला आहे. महिला आणि विशेषत: नवजात बालकांच्या मातांसाठी कपडे तयार करणाऱ्या ‘स्वीट मम्मी’ या कंपनीनं खास पाळीव प्राण्यांना अंगावर घालता येतील असे पंखे तयार केले आहेत. या पंख्यांमुळे अनेक पाळीव प्राण्यांना हा उकाडा निदान सुसह्य तरी झाला आहे. 

‘स्वीट मम्मी’च्या अध्यक्ष री उझावा यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना निघाली आणि पाळीव प्राण्यांचं, विशेषत: कुत्र्या-मांजरांचं उष्णतेपासून संरक्षण व्हावं. यासाठी पंखा असलेल्या ड्रेसचं डिझाईन त्यांनी तयार केलं. एका जाळीदार पोशाखाला बॅटरीवर चालणारा पंखा जोडण्यात आला असून, हा पोशाख प्राण्यांच्या अंगावर परिधान करता येतो. बॅटरीवर चालणारा हा पंखा असून, त्याचं वजनही केवळ ८० ग्रॅम आहे. मात्र या हवेशीर पोशाखामुळे आमच्या लाडक्या प्राण्यांचा जीव खरोखरच भांड्यात पडला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक प्राण्यांच्या मालकांनी व्यक्त केली आहे. कारण भयानक उकाड्यामुळे या प्राण्यांना बाहेर फिरायलाही घेऊन जाता येत नव्हतं. सारखं एकाच ठिकाणी कोंडून राहावं लागल्यामुळे या प्राण्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत होता. त्यांच्यातला आक्रमकपणाही वाढत होता. 

री उझावा यांनाही नेमकी हीच समस्या भेडसावत होती. त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्याला त्या कायम घरातही ठेवू शकत नव्हत्या आणि बाहेर फिरायलाही घेऊन जाऊ शकत नव्हत्या, कारण त्याला बाहेर नेल्यावर तो आणखीच अस्वस्थ होत असे. आपल्यासाठी जर पंखा, कुलर, एसी आदी अनेक सोयी असू शकतात, तर आपल्या लाडक्या प्राण्यांसाठी का नकोत, असा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी प्राण्यांसाठी हे विशेष डिझाईन तयार केलं. सुदैवानं त्यांची स्वत:ची कपड्यांची कंपनी असल्यानं प्राण्यांसाठी हे कपडे तयार करताना त्यांना विशेष अडचण आली नाही.

जपानमध्ये यावर्षी पावसाळा तसा नव्हताच.  जूनअखेरीसच तिथला पावसाळा संपला आणि अखंड  हीटवेव्ह सुरू झाल्या. यंदा जपाननं आतापर्यंतच्या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या हीटवेव्ह अनुभवल्या. त्यामुळे तिथलं तापमान तब्बल ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. जपानसाठी हा उकाडा भयंकर होता. माणसांनी तर हा उकाडा मॅनेज केला, पण प्राण्यांचं काय करणार? त्यामुळे अनेकजणांनी आपल्या पाळीव प्राण्यांच्या आसपास आईस पॅक ठेवायला सुरुवात केली. पण त्यामुळे फारसा फरक पडला नाही. पंखा असलेल्या पोशाखाचा मात्र या प्राण्यांना खूपच उपयोग होत आहे. 

प्राणी ‘माणसात’ आले!‘सन’ नावाची पाच वर्षांची ‘स्कॉटिश फोल्ड’ जातीची मांजर, पोमेरिअन आणि पूडल या संमीश्र वंशाचा नऊ वर्षांचा कुत्रा मोको... यांच्या मालकांनी आपापल्या प्राण्यांसाठी हे पोशाख खरेदी केले आणि ते खूपच खूश झाले. या पोशाखामुळे आमची लाडके प्राणी पुन्हा ‘माणसात’ आले, असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या तरी वेगवेगळ्या पाच प्रकारच्या रेडिमेड मापात हे पोशाख आहेत. त्यांची किंमत ९९०० येन (सुमारे सहा हजार रुपये) आहे.