लाखो रुपयांचं पॅकेज मिळत असेल तर अनेकदा खूपजण प्रोफाईल काय आहे, याचा फारसा विचार करत नाही. काम काय आहे, त्यापेक्षा त्या कामातून पैसा किती मिळतोय, असा विचार करणारा एक खूप मोठा वर्ग आहे. अशा वर्गासाठी एक मोठी संधी आहे. एक कंपनी कोबी तोडण्यासाठी तब्बल ६३ लाख रुपयांचं पॅकेज देत आहे. ही कंपनी ब्रिटनमधील आहे. गलेलठ्ठ इतरही अनेक सुविधा कंपनी देऊ करत आहे.
T H Clements and Son Ltd कंपनीनं त्यांच्याकडे असलेल्या भरतीसंदर्भात ऑनलाईन जाहिरात दिली आहे. संपूर्ण वर्षभर शेतातून कोबी आणि ब्रोकोली तोडण्याच्या नोकरीसाठी प्रत्येक तासाला ३० पाऊंड्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ३ हजार रुपयांपेक्षा अधिक मजुरी मिळेल. त्यामुळे वर्षाला या कामातून ६२,४०० पाऊंड्स म्हणजेच ६३ लाख ११ हजार ६४१ रुपये मिळतील. काम शारीरिक मेहनतीचं असून पूर्ण वर्षभर ते करावं लागेल, असं जाहिरातीत नमूद करण्यात आलं आहे.
कंपनीनं दोन ऑनलाईन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. कंपनीला कोबी तोडण्यासाठी फील्ड ऑपरेटिव्ह्ज हवे असल्याचं जाहिरातीत म्हटलं आहे. हे काम पीसवर्क आहे. म्हणजेच कर्मचारी जितक्या कोबी, ब्रोकली तोडेल, त्या हिशोबानं पैसे दिले जातील. या कामातून तासाला ३ हजार रुपये मिळू शकतात. हे काम पूर्ण वर्षभर चालू असेल. एका नगामागे पैसे मिळणार असल्यानं एका दिवसात जास्त पैसे मिळवण्याचा पर्यायदेखील खुला आहे. सध्या ब्रिटनमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं सरकारनं शेतीसाठी विशेष सवलत दिली आहे. त्यामुळे परदेशातील व्यक्ती या कामांसाठी अर्ज करू शकतात.