जगभरातील लोक जुगाड करण्यात चांगलेच तरबेज असतात. असाच एक अनोखा जुगाड रशियातील एका शेतकऱ्याने केला आहे. त्याने जुगाड करून एक अनोखी घोडागाडी तयार केली आहे. या घोडागाडीची खासियत म्हणजे त्याने ही घोडागाडी Audi 80 सेडान कारपासून तयार केली आहे. आणि त्याने या घोडागाडीला नाव Audi 40 असं नाव दिलं आहे.
Alexei Usikov असं या शेतकऱ्याचं नाव असून तो ३१ वर्षांचा आहे. तो त्याने केलेल्या या इनोव्हेशनमुळे चांगलाच आनंदी आहे. इतकंच नाही तर तर तो त्याच्या या सवारीला कारपेक्षा अधिक विश्वासू मानतो.
एएफपीच्या रिपोर्टनुसार, या तरूण शेतकऱ्याच्या शेजाऱ्याकडे एक फार जुनी Audi 80 कार होती. ही कार फारच वाईट अवस्थेत होती. या कारचे काहीच पार्ट्स शिल्लक राहिले होते. Alexei ने शेजाऱ्याकडे कार मागितली आणि शेजारी व्यक्तीनेही आनंदाने दिली. त्यानंतर Alexei ने कारचं इंजिन बाहेर काढलं, बॉडी पार्ट्सही कापले आणि स्टेअरिंग व्हिल भागात प्लास्टिक ट्यूब जोडून त्याला घोडा जुंपला.
Alexei हसत हसत सांगतो की, 'ही ऑडी ४० आहे. कारण मी ऑडी ८० ला अर्ध केलं'. Alexei त्याच्या या घोडागाडीचा वापर शेतातील कामांसाठी करतो. तो सांगतो की, 'माझ्या मित्रांना विश्वासही बसत नव्हता की, मी असं काही करेन. त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण माझ्या या घोडागाडीमध्ये म्युझिक प्लेअर आणि हॉर्न सुद्धा आहे.
सध्या Alexei च्या या घोडागाडीची त्याच्या गावात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्या शहरातून टांगा किंवा अशा सवारी गाड्या नाहीशा झाल्या आहेत. अशात Alexei जेव्हा त्याची ही घोडागाडी घेऊन रस्त्यावर येतो तेव्हा ट्रॅफिक पोलिसही काय करावं अशा अडचणीत सापडतात. काहीही असो पण या ऑडी घोडागाडीने सध्या सर्वांचे लक्ष वेधलं आहे.