आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यातील समुद्रालगतच्या गावांमध्ये जेथे पाण्याची समस्या आहे, त्या ठिकाणी किसान वॉटर बँकेच्या माध्यमातून खारे पाणी गोडे करण्याचा अत्याधुनिक प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून निर्माण होणारे पाणी फक्त ५० पैसे प्रति लिटर दराने देण्यात येणार असल्याचे किसान वॉटर बँकेचे मदन हरप्रित सिंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.व्यावसायिक दृष्टिकोन समोर न ठेवता केवळ सामाजिक दायित्व म्हणून हा प्रकल्प जनतेसाठी सुरु करीत आहे. यासाठी जिल्ह्यात जागेची पाहणी सुरु केली असल्याचे सिंग यांनी सांगितले. कोकणातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचे बोलले जाते.हा प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च येणार आहे. पाणी शुध्द करणाऱ्या यंत्रांची किंमत ही सुमारे २० लाख रुपये आहे. सध्या हे यंत्र दुबईसह राजस्थान, ओडिसा आणि दक्षिण भारतामध्ये कार्यरत असून त्याचा रिझल्ट सकारात्मक असल्याचे सिंग म्हणाले. स्वत:च्या विकासासाठी सर्व ग्रामीण भागातून शहराकडे धावतात, आम्ही मात्र खेड्यांच्या विकासासाठी ग्रामीण भागात काम करु इच्छितो, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.प्रकल्प सुरु करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. सध्या श्रीवर्धनमधील जागेची चाचपणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्राचे खारे पाणी गोड म्हणजेच पिण्यायोग्य होत असल्याने हा प्रकल्प सुरु झाल्यास पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही. सामाजिक बांधिलकीतून अशा प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे, असे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले.
रायगडमध्ये किसान वॉटर बँक
By admin | Published: May 06, 2015 12:59 AM