रद्दीमध्ये सापडलेली जुनी वस्तू तुमचं नशीब बदलू शकते असा विचार तुम्ही कधी केला आहे का? चिलीतील रहिवासी असलेल्या एक्सेकिल हिनोजोसा याच्यासोबत असंच काहीसं घडलं. रद्दीमध्ये त्याला वडिलांचं एक जुनं पासबुक सापडलं. मात्र त्यामुळे आता हिनोजोसाचं नशीब फळफळलं आहे. हे पासबुक ६२ वर्षे जुने होते आणि त्याद्वारे तब्बल कोट्यवधी रुपये मिळाले आहेत.
बँकेत जमा होते १.४० लाख
हिनोजोसाच्या वडिलांनी १९६०-७० च्या दशकात घर खरेदी करण्यासाठी बँकेत सुमारे १.४० लाख रुपये जमा केले होते. त्यावेळी ही रक्कम खूप मोठी होती, पण हिनोजोसाच्या वडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालं आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्यांच्या या बँक अकाऊंटयाबद्दल माहिती नव्हती. काही वर्षांनंतर, घरातील रद्दी पाहताना हिनोजोसाला एक पासबुक सापडलं. सुरुवातीला त्याला हे पासबुक फारसं महत्त्वाचं वाटलं नाही, कारण ज्या बँकेचं हे पासबुक होतं ती बँक आधीच बंद झाली होती.
एका ओळीने बदललं हिनोजोसाचं नशीब
पासबुकवरील एका ओळीने हिनोजोसाचं नशीब बदललं. पासबुकवर State Guaranteed असा एक महत्त्वाचा संदेश होता. ज्याचा अर्थ असा होता की, जर बँक बुडाली तर सरकार पैसे परत करेल. ही ओळ वाचल्यानंतर, हिनोजोसा आनंदी झाला. त्याला आशा होती की, सरकार त्याच्या वडिलांचे कष्टाचे पैसे त्यांना परत करेल. पण जेव्हा त्याने सरकारकडे पैसे मागितले तेव्हा सरकारने नकार दिला.
वडिलांमुळे मिळाले तब्बल ९ कोटी
हिनोजोसाने हार मानली नाही आणि कायदेशीर मार्ग स्वीकारला. त्याने न्यायालयात दावा केला की, हे पैसे त्याच्या वडिलांचे आहेत जे त्यांनी खूप मेहनतीने वाचवले होते. न्यायालयाने सरकारला व्याजासह पैसे हिनोजोसाला परत करण्याचे आदेश दिले. यानंतर सरकारने १.२ मिलियन डॉलर्स (तब्बल ९ कोटी रुपये) रक्कम परत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हिनोजोसा एका झटक्यात करोडपती झाला.