Trending News: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राहणारे अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे राज्य सरचिटणीस आचार्य राजेश शर्मा यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची मिरवणूक वेगळ्या पद्धतीने काढली. या मिरवणुकीची शहरात तर चर्चा आहेच, पण सोबतच सोशल मीडियावर चर्चा होत आहे. लग्नादरम्यान वधूपित्याने थेट वरात काढली आणि घोड्यावर बसून लग्नाची मिरवणूक काढली. नवरी मुलगी शुवेता भारद्वाज हिचे संपूर्ण कुटुंब तसेच नातेवाईक या सोहळ्यात सहभागी झाले होते. घोड्याच्या बग्गीवर बसून संपूर्ण शहरात ही मिरवणून फिरवण्यात आली. या मिरवणुकीत मुलींना समान सन्मान देण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न मुलीच्या वडिलांकडून करण्यात आला. घरात मुलगी जन्माला आल्यावर काही लोक अजूनही तितका जल्लोष किंवा आनंद व्यक्त करत नाहीत असे सांगितले जाते. याच लोकांना संदेश देण्यासाठी राजेश शर्मा यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला.
वधूपित्याच्या 'त्या' कृत्याची सोशल मीडियावर प्रशंसा
घोडेस्वारीदरम्यान बग्गीवर स्वार झालेल्या नववधू श्वेता भारद्वाजचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लोक श्वेता आणि तिचे वडील राजेश शर्मा यांचे कौतुक करत आहेत, कारण एक पिता आपल्या मुलीला समान वागणूक देत आहे. तिला सन्मान देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. लग्नासाठी आलेल्या लोकांकडून या लग्नाचे खूप कौतुक केले जात आहे. मुलीचे वडील राजेश शर्मा म्हणाले की, घोडेस्वारीच्या माध्यमातून मुलीला सन्मान देण्याबरोबरच समानता आणि महिला सबलीकरणाच्या हक्कांना चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. मुलींना तो मान दिला जात नाहीत पण तसं करू नका हा संदेश समाजाला देता यावा यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. मुलीला ओझं समजू नका, मुलीला समान हक्क मिळवून द्या, असे त्या वडिलांनी सांगितले.
शुवेताच्या कुटुंबात कोण कोण? तिचे लग्न कोणाशी झाले?
श्वेताचे वडील आचार्य राजेश शर्मा हे शाळेचे संचालक आहेत आणि त्यासोबतच ते अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे राज्य सरचिटणीस आहेत. राजेश शर्मा यांच्या सह पत्नी कुसुम शर्मा, मुलगा अंकित भारद्वाज आणि मुलगी शुवेता भारद्वाज असा परिवार आहे. २७ वर्षांपूर्वी ७ डिसेंबर रोजी श्वेताचा जन्म झाला. त्यावेळी तिच्या घरात इतर कुटुंबांप्रमाणे आनंद साजरा केला जात नव्हता. तेव्हापासून वडिलांच्या मनात इच्छा होती की, मुलीलाही समान सन्मान मिळावा. वडिलांनी मुलीला शिक्षण देऊन फॅशन डिझायनर बनवले. आता तिच्या वाढदिवशी तिचे लग्न माढोला परिसरातील लाइनपार येथील अभियंता सिद्धार्थसोबत झाले. मुलीच्या वाढदिवशी तिचे लग्नही वडिलांनी ठरवले होते.