रांची – शहरात निघालेल्या एका वरातीची बरीच चर्चा सुरू आहे. ही वरात मुलीला सासरी पाठवताना नव्हे तर तिची सासरच्या जाचातून सुटका केल्यासाठी निघाली होती. वडिलांनी सासरकडून होणाऱ्या मुलीचा छळ रोखण्यासाठी तिला परत घरी आणले. एवढेच नाहीतर घरी आणताना बँडबाजा, आतषबाजीसह वरात काढली. १५ ऑक्टोबरच्या या वरातीचा व्हिडिओ सोशल मीडियात त्यांनी पोस्ट केला.
फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की, मोठ्या आशेने आणि धुमधडाक्यात बाप मुलीचे लग्न लावतो. परंतु पार्टनर आणि कुटुंब चुकीचे ठरले तर आपल्या मुलीला आदर आणि सन्मानाने घरी परत आणायला हवे कारण मुली खूप मौल्यवान असतात असं त्यांनी म्हटलं. मुलीच्या वडिलांचे नाव प्रेम गुप्ता असे आहे. जे रांचीतील कैलाशनगर भागात राहतात. २८ एप्रिल २०२२ रोजी मुलगी साक्षी गुप्ताचे सचिन कुमार या युवकाशी लग्न लावले होते. तो झारखंडच्या वीज वितरण कंपनीत सहायक अभियंता म्हणून कामाला आहे.
लग्नाच्या काही दिवसानंतर सासरी मुलीचा छळ होऊ लागला. पती मुलीला बाहेर काढायचा. लग्नाच्या १ वर्षानंतर साक्षीला कळाले की, ज्याच्यासोबत तिचे लग्न झाले आहे त्याने याआधीच २ लग्न केली आहे. हे साक्षीला समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वकाही जाणूनही मी हिंमत हरली नाही आणि नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु छळ आणि अत्याचाराला कंटाळून या नात्यात राहणे कठीण आहे हे कळल्यानंतर साक्षीने नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
साक्षीच्या वडिलांनी आणि तिच्या घरच्यांनी तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर सासरहून माहेरी आणताना बँडबाजा, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुलीची छळातून सुटका झाल्याने वडिलांनी आनंद व्यक्त केला. साक्षीने नवऱ्यासोबत घटस्फोट देण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. नवऱ्याने पोटगी द्यावी अशी तिची मागणी आहे. लवकरच घटस्फोटावर शिक्कामोर्तब होईल असी साक्षीच्या कुटुंबाला आशा आहे.