Teacher in School Uniform: शाळेतील मुलांची मन:स्थिती आणि त्यांची मानसिक पातळी समजून घेऊन शिक्षकांनी वर्गात कोणताही विषय शिकवला तर तो थेट मुलांच्या मनापर्यंत जातो, असे म्हणतात. असाच काहीसा पुढाकार एका शिक्षिकेने घेतला. शिक्षिका जान्हवी यदू यांनी हा उपक्रम स्वत:च हाती घेतला. छत्तीसगडमधील रायपूर येथील सरकारी शाळेतील एका दृश्याने मुलांना खूप आश्चर्य वाटलं. कारण साधारणपणे फक्त शिक्षकच मुलांच्या गणवेशात शाळेत येतात. पण रायपूरच्या एक शिक्षिकेने मात्र वेगळाच उपक्रम हाती घेतला. त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
नक्की काय आहे उपक्रम?
रामनगरमध्ये असलेल्या सरकारी गोकुलराम वर्मा प्राथमिक शाळेतील शिक्षिका जान्हवी यदू यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला. शाळेच्या गणवेशात शिक्षिका शाळेत पोहोचली. शिक्षिकेला पाहिल्यावर मुलांनाही खूप आनंद झाला. शिक्षिका जान्हवी यदू (Teacher Janvhi Yadu) यांना नव्या रुपात पाहून मुलांना खूपच वेगळं वाटलं. शिक्षक आपला चांगला मित्र आणि मार्गदर्शक असल्याचे मुलांच्या मनात भावना आली आणि त्यातून मुलांनी अभ्यासात रस घेतला, असे जान्हवी यदू यांनी सांगितले.
शिक्षिकेने गणवेश का घातला?
मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांच्यात शिस्तीची भावना रुजवण्याच्या उद्देशाने शिक्षिका जान्हवी यदू यांनी शाळेतील मुलांप्रमाणेच शाळेचा गणवेश परिधान करून यायला सुरुवात केली. त्यामुळे जे विद्यार्थी गणवेश घालून शाळेत येत नव्हते, ती मुले गणवेश घालूनच शाळेत येऊ लागली. राजधानी रायपूरच्या रामनगर येथील सरकारी गोकुलराम वर्मा प्राथमिक शाळेत हे दृश्य दिसले. वर्गात शिकवले जाणारे विषय मुलांना कितपत समजतात याचे मूल्यांकन करण्यासाठी, शाळेच्या गणवेशातील शिक्षिका मुलांमध्येच बसली आणि त्यांना जे समजण्यास अडचण येत होती, त्या गोष्टी पुन्हा त्यांच्यामध्ये बसून शिकण्यास मदत केली.
शिक्षिका जान्हवी यदू सांगतात की, शिक्षक हे शाळकरी मुलांचे प्रेरणास्त्रोत असतात. शिक्षकांना पाहिल्यानंतरच मुलांमध्ये शिस्त विकसित होते. शिक्षकांनी शाळेचे नियम नीट पाळले तर मुलेही त्यांचे पालन करतात. मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी नवीन गेटअपमध्ये शाळेत यायला सुरुवात केली, त्यामुळे अनेक रंजक अनुभवही आले, असे शिक्षिकेने सांगितले. अशा उपक्रमाने मुलेही शिक्षिकेला मित्र मानून शाळेच्या अभ्यासात अधिक चांगल्या पद्धतीने रस घेत असल्याचेही शिक्षिकेने सांगितले.