आधी आमदार बनले मग राजकारणाला रामराम करत न्यायव्यवस्थेत परतले अन् न्यायाधीश झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 03:55 PM2024-07-28T15:55:05+5:302024-07-28T15:55:30+5:30
नुकतेच उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. निकम यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र असे अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी राजकारणातून न्यायव्यवस्थेत पुन्हा एन्ट्री घेतली.
नवी दिल्ली - भारतीय न्यायव्यवस्था आणि राजकारण यांचं खूप जवळचं नातं आहे. अनेकदा न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. मात्र काही असे नेते आहेत ज्यांनी राजकारणातून न्यायव्यवस्थेत जात स्वत:चं नशीब आजमावलं आणि मुख्य न्यायाधीशाच्या खुर्चीतही बसले. त्यातीलच एक न्यायाधीश फेरडिनो रेबेलो (Ferdino Rebello) जे आधी आमदार बनले त्यानंतर न्यायाधीश आणि मग मुख्य न्यायमूर्तीही झाले.
फेरडिनो रेबेलो यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९४९ साली झाला. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईच्या गर्वनमेंट लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. याठिकाणी एलएलबीची पदवी घेतल्यानंतर जुलै १९७३ साली त्यांनी वकिलीची सुरुवात केली. वकिलीच्या काळात रेबेलो यांचं राजकारणातही विशेष स्वारस्य होतं. त्यानंतर त्यांनी थेट जनता पार्टीत प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली.
रेबेलो यांनी १९७७ साली जनता पार्टीच्या तिकिटावर गोवा इथं विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते जिंकले. १९८९ मध्ये रेबेलो हे जनता पार्टीच्या तिकिटावरच लोकसभा निवडणुकीत उभे राहिले. परंतु यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजकीय पराभवानंतर ते पुन्हा वकिलीकडे वळले. न्या. रेबेलो १९८२ पर्यंत पणजीच्या ज्यूडिशियल कमिश्नर कोर्टात प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या पणजी बेंचमध्ये त्यांनी प्रॅक्टिस केली. त्याठिकाणी ते बरेच चर्चेत आले. विशेषत: संविधानिक कायदे आणि सर्व्हिस प्रकरणात त्यांनी अनेक खटले जिंकले.
१९९४ साली रेबेलो हे गोवा हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्षही बनले. १९९५ साली त्यांना सिनिअर वकील बनवण्यात आलं. त्यानंतर १५ एप्रिल १९९६ साली रेबेलो यांना मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश नियुक्त करण्यात आले. जवळपास २ वर्षानंतर एप्रिल १९९८ साली ते कायमस्वरुपी न्यायाधीश बनले. मुंबई हायकोर्टात १२ वर्ष सेवा दिल्यानंतर २०१० साली रेबेलो यांची बदली इलाहाबाद हायकोर्टात मुख्य न्यायाधीश म्हणून करण्यात आली. २६ जून २०१० ते ३० जुलै २०११ पर्यंत ते तिथे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.
आणखीही बरेच उदाहरणं
राजकारण सोडून न्यायव्यवस्थेत आलेले न्या. रेबेलो एकमेव नाहीत तर न्यायाधीश आफताफ आलम यांचीही कहाणी प्रसिद्ध आहे. ते सीपीआयचे सदस्य होते, त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले. काही काळानंतर काँग्रेसचा राजीनामा देत पुन्हा वकिली क्षेत्राकडे वळले. हायकोर्टाचे न्यायाधीश झाले. गुजरातमधील प्रसिद्ध शोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर केसचा खटल्यामुळे ते न्या. आफताफ आलम चर्चेत आले होते. तेव्हा ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत मोर्चा उघडला होता.