(Photo : Times Of India)
भारतात जंगली प्राण्यांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती दिसतात. नुकताच एक असा प्राणी आढळून आला ज्याला बघण्यासाठी लोकांचे डोळे आतुरलेले असतात. एका दुर्मीळ बिबट्या जंगलात आढळून आला आहे. याची खासियत म्हणजे हा बिबट्या 'गुलाबी' (Pink Leopard) आहे.
Times Of India च्या रिपोर्टनुसार, हा बिबट्या दक्षिण राजस्थानच्या (Rajasthan) अरावली डोंगरातील रणकपूर भागात आढळून आला. क्लाउड डिसूजा यांच्या रिपोर्टनुसार, याआधी २०१२ आणि २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत गुलाबी बिबट्या आढळून आले होते.
भारतात याआधी १९१० मध्ये पांढरा बिबट्या दिसला होता. त्यानंतरपासून नॉर्मल आणि काळे बिबटेच दिसू लागले होते. रणकपूर आणि कुंभलगढमध्ये राहणाऱ्या लोकल लोकांनी सांगितलं की, त्यांनी त्यांच्या भागात अनेकदा एक मोठी मांजर पाहिली आहे. तिचा रंग गुलाबी आहे.
उदयपूरचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हितेश मोटवानी यांनी सांगितलं की, त्यांनीच या गुलाबी बिबट्याचे फोटो क्लिक केलेत. ते म्हणाले की, यासाठी ते चार दिवस फिरत होते. तेव्हा कुठे त्यांना बिबट्या दिसला. या बिबट्याचं वय ५ ते ६ वर्ष सांगितलं जात आहे. याआधी गुलाबी रंगाचा बिबट्या दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. जेनेटिक म्युटेशनमुळे या बिबट्यांचा रंग बदलतो. पण हे फार दुर्मीळ असतात.