Fish Rain In Iran : सोशल मीडियावर दररोज अनेक आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही आतापर्यंत पाण्याचा पाऊस किंवा फार तर फार आम्लधारी पाऊस(Acid Rain), याबद्दल ऐकले असेल. पण, आता चक्क माशांचा (Fish Rain) पाऊस पडल्याची घटना घडली आहे.
अचानक आकाशातून माशांचा पाऊस पडताना पाहून लोकही चक्रावून गेले. या अनोख्या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, त्यात आकाशातून माशांचा वर्षाव होताना दिसत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कसे शक्य आहे? ही घटना एका शक्तिशाली चक्रीवादळामुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे. या वादळाने माशांना समुद्रातून आकाशाकडे खेचले, नंतर जमिनीवर फेकले. त्यामुळे खरोखरच माशांचा पाऊस पडत असल्याचे दृष्य पाहायला मिळाले.
इराणमधील यासुज भागात ही दुर्मिळ घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दुर्दैवी गोष्ट म्हणजे, आकाशातून पडणारे मासे जिवंत होते आणि रस्त्यावर पडताच जगण्यासाठी धडपडताना दिसले. @UKR_token हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत एक लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, तर अनेक युजर्सनी चकित होऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.