Andhra Pradesh :आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांच्या जाळ्यात अशी बस्तू अडकली, जी पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला. 100 किलोपेक्षा जास्त वजनाची ही वस्तू दिसताच मच्छिमारांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर ही बाबत तातडीने नौदलाला कळवण्यात आली. ही माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
झाले असे की, नेल्लोर येथील काही मच्छिमार मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. त्यांनी समुद्रात जाळे टाकले असता, त्यात एक मोठी वस्तू अडकली. जाळ्यात मोठा मासा अडकला, असा मच्छिमारांचा समज झाला. त्यांनी जाळे वर ओढल्यावर त्यांना जाळ्यात सुमारे शंभर किलोचे रॉकेट आढळले. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी पुढे नौदलाला पाचारण केले. नौदलाने सांगितले की, हे रॉकेटचे शेल आहे, पण नौदलाचे नाही.
सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या रॉकेटची रीतसर तपासणी केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, या रॉकेटमध्ये कोणतीही दिशादर्शक यंत्रणा नाही किंवा ट्रिगरिंग यंत्रणा किंवा फ्यूज नाही. याशिवाय, यात कुठल्याही प्रकारचे द्रव किंवा इंधनही नाही. असे असताना हे रॉकेट येथे कसे आले आणि कोणी आणले, याचा तपास सुरू आहे.