Fitness Challenge of 10 Lakh: जर कोणी तुम्हाला फिटनेस चॅलेंज दिले आणि वजन कमी करण्याच्या बदल्यात १० लाख रुपये देऊ केले तर तुम्ही काय कराल? कदाचित तुम्ही १० लाख रुपये जिंकण्यासाठी रात्रंदिवस मेहनत आणि व्यायाम कराल. मग ही ऑफर आता खरंच दिली जातेय. ही ऑफर प्रत्यक्षात एका कंपनीने दिली आहे. देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म Zerodha चे संस्थापक नितीन कामत यांनी कर्मचाऱ्यांसाठी हे फिटनेस चॅलेंज जाहीर केले आहे.
कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस चॅलेंजची घोषणा
कंपनीच्या या आकर्षक घोषणेनंतर Zerodha कंपनीचे कर्मचारी जिममध्ये चांगलाच घाम गाळत आहेत. नितीन कामत यांच्या घोषणेनुसार, Zerodha कर्मचाऱ्यांना वजन कमी करण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळू शकते. या पूर्वीही नितीन कामत यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी फिटनेस चॅलेंज जाहीर केले होते. एप्रिलमध्येही कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून १५ दिवसांचा पगार देण्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. त्या वेळी असे सांगण्यात आले होते की, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा BMI (बॉडी मास इंडेक्स) २५ पेक्षा कमी असेल, त्याला १५ दिवसांचा पगार बक्षीस म्हणून दिला जाईल.
'इन्सेंटिव्ह'सह १० लाखांचे बक्षीस मिळणार!
कर्मचाऱ्यांचा फिटनेस लक्षात घेऊन Zerodhaने चॅलेंज जाहीर केले आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक कामांची लांबलचक यादी समाविष्ट करण्यात आली आहे. आव्हान पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता (Incentives) सह १० लाख रुपयांचे बक्षीस मिळू शकते. पण ही ऑफर कंपनीतील कोणताही एकच कर्मचारी जिंकू शकणार आहे.
'सतत बसून राहणे अणि काम करणे - हा धूम्रपानाचा वेगळा प्रकार आहे'
कामत यांनी ट्विटरवर लिहिले की, 'Zerodhaचे बहुतांश कर्मचारी WHF म्हणजेच वर्क फ्रॉम होम पद्धतीचे काम करत आहेत. सतत बसून राहणे हा धूम्रपानाचा एक वेगळा प्रकार आहे. तो हळूहळू महामारीत बदलत आहे. त्यामुळे कंपनीकडून टीमसाठी जे काही केले जात आहे, त्यातून ते आणि त्यांचे कुटुंब निरोगी व आरोग्यदायी भविष्याची वाटचाल करतील, अशी अपेक्षा आहे.'
त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये कंपनीच्या पुढाकाराची घोषणा केली. कामत यांनी लिहिले की, 'कोरोनानंतर सुरुवातीला माझेही वजन वाढले होते. त्यानंतर मी ट्रॅकिंग सुरू केले आणि योग्य डाएट सुरू केले. यानंतर दररोज १ हजार कॅलरीज बर्न करणे हे माझे टार्गेट होते आणि ते अमलात आणले. कंपनीने आता आणलेला हा पर्यायी कार्यक्रम आहे, ज्यामध्ये दररोज किमान ३५० कॅलरीज बर्न कराव्या लागतात.'