- योगेश बिडवईलग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं. जावई व मुलीच्या कुटुंबीयांची गाठ मात्र कोण बांधतो, हे सांगणं अवघड आहे. काळानुरूप जावईबापूंमध्ये बदल झाला असला, सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबांत जावई काही ठिकाणी मुलाची भूमिका बजावत असले; तरी त्यांचे इरसाल नखरे आजही कायम आहेत. महाराष्ट्रात तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण या प्रत्येक भागात जावयाचे लाड करण्याच्या, त्याचे नखरे सहन करण्याच्या अनेकविध पद्धती आजही कायम आहेत. कधीकधी तर या नखऱ्यांचे ओझे हेही आत्महत्येचे कारण ठरते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांची ससेहोलपट होते. ज्येष्ठ महिन्यातील षष्ठी ही बंगालच्या अनेक प्रांतांत जमाई षष्ठी म्हणून साजरी केली जाते. जावयाचे लाड पुरवले जातात, त्यानिमित्त या दशम ग्रहाबद्दल... ‘‘दिवाळीला तुझ्या घरी आलो होतो, तेव्हा काय केलं तर पिठलंभाकरी. दिवाळीत पिठलंभाकरी... हीच काय जावयाची किंमत. काही गोडधोड नाही की चमचमीत. यापुढे तुझ्या घरी कधी येईल तर शपथ...’’ नवरा आपल्या बायकोजवळ जावयाचा तुझ्या कुटुंबीयांनी कसा अपमान केला, हे सांगत होता. त्यानंतर, उन्हाळ्यात जावयाला पुरणाची पोळी, आमरस असं साग्रसंगीत जेवण अन् कपड्यांचा जोड दिल्यानंतर कुठं जावईबापू शांत झाले. जावई म्हणजे अशा प्रकारे अनेकांना संकट वाटणं साहजिक आहे. महाराष्ट्रात तर जावयाच्या तऱ्हाच निराळ्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात लग्न म्हणजे सोहळाचा असतो. जावई, त्याचे कुटुंबीय, नणंद, भावजया यांची बडदास्त ठेवावी लागते. हुंडा, त्यासोबतच जावयाला अंगठी, लॉकेट शक्य असेल, तर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा सगळा संसारच उभा करून द्यावा लागतो. सोबत व्याही, विहीणबाई, नणंद यांचाही मानपान सांभाळावा लागतो. थोडं कुठं कमीजास्त झालं, तर गोंधळच. या सगळ्या परंपरा सांभाळण्यात एखादा मध्यमवर्गीय बाप खचला नाही म्हणजे मिळवलं. आयुष्याची जमापुंजी मुलीच्या लग्नात लावावी लागते. त्यातही पुन्हा एखाद्या लॉनमध्ये लग्न झालं पाहिजे, असं काही जावयांना वाटतं. लॉनच्या खर्चावरून काही स्थळं वधुपित्यानं नाइलाजानं नाकारल्याचीही उदाहरणे आहेत. लग्नात पुन्हा घोडा हवा. नाशिक ढोलच पाहिजे. विशिष्टच बॅण्जोसाठी गळ घातली जाते. लग्नातच बरंचसं दिलं जातं. लग्नानंतर पाचव्या दिवशी मुलीला बोलावलं जातं. तिच्यासोबत जावईसुद्धा येतो. मग, त्याची बडदास्त ठेवावी लागते. हे झालं लग्नाचं. खरं नातं तर पुढं सुरू होतं. पहिली दिवाळी. मग, जावयाला कपडे. जमलंच तर एखादा सोन्याचा दागिना. दोनचार दिवस जावई राहणार, म्हणजे अख्ख घरं त्याच्या पुढंपुढं करायला सरसावलेलं असतं. दिवाळी झाली की, मग संक्रांत. हो, परंपरा सांभाळायला नको का? खान्देशातील तऱ्हाही अशीच न्यारी. लग्नातील सर्व प्रथापरंपरा पाळाव्या लागतात. रूखवतात कूलर, टीव्ही, संसारोपयोगी वस्तू दिल्या जातात. नवरदेवाकडच्या बायकांना साड्या द्याव्या लागतात. हलक्या साडीवरून रुसवेफुसवे होतात. लग्नानंतर हळद काढतात, तेव्हा जावयाला बोलावलं जातं. परत सगळा मानपान. नंतर, घरी लग्न निघालं, तर जावयाला प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण दिलं जातं. एवढंच नाही, तर त्याला भाड्याचे पैसे द्यावे लागतात. नाहीतर, जावईबापू लग्नाला येतील, याची खात्री नसते. लग्नाच्या पंगतीत त्यांचा मानपान ठेवावा लागतो. घरचा नवरदेव राहिला बाजूला. जावयाला काही कमी पडत नाही ना, हे पाहिलं जातं. नाहीतर, जावई रुसला, तर काही खरं नाही. अक्षयतृतीया हा खान्देशातील मोठा सण. मुलगी महिनाभर माहेरी येते. साहजिकच, तिच्यासोबत जावयाला बोलवावं लागतं. जावई दोनचार दिवस राहतात. मग, त्यांना कपडेलत्ते करणं आलंच. एखादा सोन्याचा दागिना त्यांच्यासाठी केला, तर जावयाची तुमच्यावर माया राहते. दिवाळीतही जावयाचा मानपान सांभाळावा लागतो. दर तीन वर्षांनी अधिकाचा महिना येतो. त्यात अधिक वाण द्यावं लागतं. पुन्हा अंगठी आणि कपडे घेणे आलेच. मुलगी बाळंतपणाला आल्यानंतर बाळाच्या बारशाला जावईबापू येतात. त्यांना ऐपतीप्रमाणे टॉवेल टोपी अन् मानपान... असं हे जावयाचं स्तोम असतं. मराठवाड्यातही काही कमी प्रथा-परंपरा नाहीत. फाटक्या बापालाही लग्न म्हटलं, तर अडीच तीन लाख रुपये खर्च येतो. बरं, पुढं धोंड्याचा महिना, दिवाळी, संक्रांत हे सणवार सुरूच असतात. शिवाय, जावई येईल तेव्हा त्याचा मानपान ठेवावा लागतो. काही समाजांत लग्नानंतर होळी, राखी पौर्णिमेला मुलगी माहेरी आल्यानंतर, तिला घ्यायला जावई आल्यानंतर सर्व प्रथेप्रमाणे करावं लागतं. किमती वस्तू कर्ज काढून दिल्या जातात. ऋण काढून सण साजरे करावे लागतात. विदर्भातही जावयाचा काही कमी बडेजाव नसतो. लग्नात सर्व देवाणघेवाण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मांडवपरतणी असते. नवरीचा भाऊ तिला माहेरी आणायला जातो. ती दोनतीन दिवस थांबल्यानंतर महोदय तिला आणायला जातात. मग, परत कपडे घ्या. जावईबापूचे पाय सासूसासरे धुतात. त्यांना काय हवे नको, ते विचारतात. मुलगी दरवर्षी माहेरी जाते. तिला आणायला जावई आले की, सगळे घर त्यांच्या दिमतीला. भेटवस्तू दिल्याशिवाय त्यांना सहसा जाऊ दिले जात नाही. आखाजीतही जावयाची ऐट पाहण्यासारखी असते. आता भेटवस्तूऐवजी काही जावई थेट पैसे मागतात, हे वेगळे सांगायला नको. कोकणात या बाबतीत फारशा प्रथा नाहीत. ऐपतीप्रमाणे जावयाला मान दिला जातो. लग्नखर्च बऱ्याचदा दोन्हीकडची मंडळी वाटून घेतात. मुली शिकल्या अन नखरे संपलेमहाराष्ट्रात सर्वच समाजांत कमीअधिक प्रमाणात मानपानाची प्रथा आहे. त्यात कोणीही मागे नाही. एकाला झाकावं अन् दुसऱ्याला दाखवावं, अशी स्थिती आहे. मात्र, आता त्यात बदल होत आहेत. मुली शिकल्या, नोकरी करू लागल्या. त्यामुळे त्याच आपल्या नवऱ्याचे नखरे सहन करत नाहीत. माहेरी जाताना नवऱ्याला आधीच सर्व जाणीव करून देतात. रुसव्याफुसव्यांची कारणेलग्नात जावई, त्याच्या कुटुंबाचे रुसवेफुसवे सुरूच असतात. वऱ्हाडी मंडळींना सकाळी अंघोळीला गरम पाणी नव्हते.चहा काय गुळचट होता, दुधाचा तर त्यात पत्ताच नव्हता.नाश्त्याला काही चव होती का? हे काय जेवण होते का?पाहुण्यांचे पायच धुतले नाहीत.जावयाचे आईवडील एक संकटजावयाच्या आईवडिलांचेही काही कमी नखरे नसतात. त्यांना कुठं काही कमी पडलं, तर विघ्न आलंच समजायचं लग्नात. नवरदेवाएवढी त्यांचीही काळजी घ्यावी लागते. नंतरही वेळोवेळी त्यांचा मानपान ठेवावा लागतो. विदर्भात जेवणाचा आग्रहविदर्भात जावयाला जेवणाचा आग्रह केला जातो. मग, तो लाजतो आणि पोट फुटेपर्यंत त्याला वाढले जाते. हा अन्याय असल्याचे जावई सांगतात. जावई नव्हे मुलगा! शहरात सुशिक्षित कुटुंबात एकुलती एक मुलगी असलेल्या ठिकाणी जावई आता सासूसासऱ्यांची आईवडिलांप्रमाणे काळजी घेतात. त्यांचं दुखलंखुपलं तर दवाखान्यात नेण्यापासून त्यांचं सर्व करतात. काही जावयांकडे अर्थात मुलीकडे आईवडील राहत असल्याचीही उदाहरणे आहेत. जावई हे सासूसासऱ्यांना मुलांप्रमाणे प्रेम देतात.
जावयाचे नखरे!
By admin | Published: May 28, 2017 1:26 AM