फ्लोरिडातील एक वयोवृद्ध महिला एटीएमवर पैसे काढायला गेली. तिला अकाऊंटमधून केवळ २० डॉलर म्हणजे १४०० रूपयेच काढायचे होते. पण तेव्हाच तिच्या लक्षात आलं की, तिच्या अकाऊंटमध्ये कोट्यावधी रूपये आहेत तर ती हैराण झाली. WFLA नुसार, Julia Yonkowski लोकल बॅंकेत गेली होती. तिथे गेल्यावर तिला समजलं की, तिच्या अकाऊंटमध्ये चुकून कोट्यावधीची रक्कम जमा झाली.
ज्युलिया यांना २० डॉलर काढण्याआधी बॅलन्स चेक करायचा होता. शनिवारी त्यांना मिळालेल्या बॅंक स्टेटमेंटमध्ये त्यांना ९९९,९८५,८५५.९४ डॉलर पडलेले दिसले. भारतीय करन्सीनुसार, ही रक्कम ७४,३९,१९,४७,७८०,९४ रूपये इतकी होते. म्हणजे त्यांच्या बॅंक अकाऊंटमध्ये अब्जो रूपये होते.
त्या म्हणाल्या की, 'अरे देवा, ती रक्कम बघून मी घाबरले होते. मला वाटतं अनेकांना वाटत असेल की, मला लॉटरी लागली. पण हे सगळं मला घाबरवणारं होतं. त्यांनी पुढे सांगितलं की, जेव्हा मी २० डॉलर काढण्यासाठी मशीनमध्ये कार्ड टाकलं तेव्हा मेसेज आला की, आम्ही तुम्हाला २० डॉलर देणार, पण त्यासाठी चार्ज लागेल'.
ज्युलिया यांना जेव्हा समजलं की, त्यांच्या अकाऊंटमध्ये अब्जो रूपये पडले आहेत. तरी सुद्धा त्यांनी या रकमेतील एका रूपयालाही स्पर्श केला नाही. त्या म्हणाल्या की, 'मी अशा अनेक घटना ऐकल्या होत्या की, लोक आधी पैसे काढतात, नंतर त्यांना पूर्ण रक्कम परत द्यावी लागते. मला ते पैसे नकोत, कारण ते माझे पैसे नाहीत.
ज्युलिया यांना भीती आहे की, त्यांचे पैसेही यातून खर्च होऊ नये. सध्या तरी त्या टेंपररी अब्जाधीश झाल्या आहेत. बॅंक अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की, मुळात ज्युलिया यांच्या बॅंक खात्याचं बॅलन्स निगेटीव्ह होतं. कोणत्याही बॅंक खात्यात संशयास्पद काही झालं तर अशाप्रकारच्या संख्येचा वापर केला जातो. याच कारणामुळे केवळ २० डॉलरही त्या खात्यातून काढू शकल्या नाहीत.