नैनीताल - टूरिस्ट डेस्टिनेशन शोधून तुम्हाला कंटाळा आलाय का? आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा इरादा आहे का? तर तुमच्यासाठी जेल ही एकमेव जागा उरली असेल. विचार करताय ना..ज्याठिकाणी एखादा गुन्हा केल्यानंतर कैद्यांना ठेवले जाते तिथे तुम्ही कसं राहू शकता? तर त्यावर भन्नाट उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे ५०० रुपये खर्च करून एका रात्रीसाठी जेलचा अनुभव घेऊ शकता.
नैनीताल जिल्ह्यातील हल्द्वानी जेलमधील एक भाग खास पर्यटकांसाठी तयार करण्यात येत आहे. हे कारागृह १९०३ मध्ये बनवण्यात आले होते. कारागृहाचे उप अधीक्षक सतीश सुखीजा यांनी सांगितले की, जेलच्या ६ स्टाफ क्वॉर्टरसह जुने शस्त्रागृह अनेक काळापासून बंद आहे. याठिकाणी जेलच्या पाहुण्यांना ठेवण्याची तयारी सुरू आहे. अनेकदा वरिष्ठ अधिकारी काही लोकांना जेलमध्ये थोडा वेळ घालवण्यासाठी परवानगी देतात. त्यावरूनच जेलमध्ये वरिष्ठांना एक प्रस्ताव सादर करून लोकांना राहण्यासाठी मंजुरी मिळवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे जेलमध्ये आलेल्या पाहुण्यांना कैद्यांप्रमाणे कपडे आणि जेलच्या किचनमध्ये बनवण्यात येणारे जेवण खायला मिळणार आहे. एका ज्योतिषानुसार, जेव्हा कुणाच्या जन्म कुंडलीत शनी, मंगळसोबत ३ ग्रह प्रतिकुल स्थितीत येतात तेव्हा ती व्यक्ती जेलमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या व्यक्तीने जेलमध्ये एक रात्र घालवून कैद्यांसारखे जेवण करायला हवे असं त्यांनी सांगितले. मात्र तत्पूर्वी पोलिसांनी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवत जेलमध्ये पर्यटनासाठी आलेल्यांना ५०० रुपये चार्ज आकारत राहण्याची परवानगी द्यावी असं मंजूर केले आहे.