पुणे : मुलीचा पहिलाच वाढदिवस...त्यामुळे घरात रेलचेल सुरू होती... पाहुणे येत होते... त्यांच्या सरबराईत मुलीकडे लक्षच राहिले नाही... अशातच खेळता खेळता चिमुकलीने आल्याचा तुकडा घेतला आणि तोंडात टाकला. तो थेट घशात गेला आणि तेथे अडकला. त्यामुळे मुलीला श्वास घेता येईना...आल्याचा एक तुकडाच या चिमुकलीच्या जीवावर बेतला. डॉक्टरांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी तातडीने शस्त्रक्रिया केली आणि शर्थीचे प्रयत्न करून घशात अडकलेला तुकडा काढला. मुलीला जीवदान दिले. आदिती वायदंडे या एका वर्षाच्या चिमुकलीवर बेतलेली घटना आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी तिचा जीव वाचविला.शिरूर येथे राहत असलेल्या आदितीचा पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने आल्याचा एक मोठा तुकडा गिळला. जो तिच्या घशात जाऊन अडकला. त्यानंतर ती अस्वस्थ झाली. आदितीच्या आईला हे कळताच त्यांनी तो तुकडा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो तुकडा आणखी आत गेल्याने आदितीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांनी लगेचच घराजवळच्या डॉक्टराकडे धाव घेतली. प्रयत्न केल्यानंतरही काही होत नसल्याने संबंधित डॉक्टराने रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आदितीला अत्यवस्थ अवस्थेत तिच्या पालकांनी ससून रुग्णालयात आणले. डॉ. जोशी आणि त्यांच्याबरोबर डॉ. राहुल ठाकूर, डॉ. सारिका, डॉ. विदुला, डॉ. सोनाली, भूलतज्ज्ञ डॉ. विनया कुलकर्णी यांनी आदितीवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आणि यशस्वीपणे आल्याचा तुकडा काढला. मात्र, श्वास घेता न आल्याने आदितीच्या फुफ्फुसांवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला तातडीने बालकांच्या आयसीयूमध्ये हलविण्यात आले. तेथे बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संध्या खडसे यांनी तिच्यावर उपचार केले. आता आदिती बरी होत आहे. त्यामुळे तिच्या आईच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.
आल्याचा तुकडा बेतला चिमुकलीच्या जीवावर
By admin | Published: July 26, 2015 12:33 AM