भोपाळ: पाऊस पडावा म्हणून बेडकांचं लग्न लावल्याचे प्रकार तुम्ही अनेकदा ऐकले असतील. मात्र मध्य प्रदेशात चक्क दोन बेडकांचा घटस्फोट करण्यात आला. मुसळधार पाऊस थांबावा यासाठी बेडकांचं लग्न मोडण्यात आलं. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये हा अजब प्रसंग घडला.जुलै महिन्यात भोपाळमध्ये दुष्काळी परिस्थिती होती. बेडकांचं लग्न लावल्यास पाऊस पडेल, या भावनेनं १९ जुलैला स्थानिकांनी दोन बेडकांचं लग्न लावलं. यानंतर भोपाळमध्ये जोरदार पाऊस झाला. जवळपास दोन महिने पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे भोपाळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. शहरात पूर आल्यानं स्थानिकांनी बेडकांचं लग्न मोडलं. पाऊस थांबावा यासाठी स्थानिकांनी बेडकांचा घटस्फोट घडवला. यावेळी शिवसेना शक्ती मंडळाचे सदस्य उपस्थित होते. लग्न मोडताना मंत्रोच्चारदेखील करण्यात आले. इंद्रापुरी भागात हा कार्यक्रम संपन्न झाला. यंदाच्या मान्सूनमध्ये भोपाळमध्ये सरासरीच्या तुलनेत २८ टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
...म्हणून त्यांनी घडवला दोन बेडकांचा घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 3:36 PM