नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनानिमित्त आज सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. देशातील सैन्य, पोलीस यांच्या वीरगाथाची सर्वच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सगळीकडे तिरंग्याचा फोटो लावला जात आहे. अनेकदा आपण रस्त्यावर पोलीस सुरक्षेसाठी पाहतो. देशभरात पोलिसांच्या वर्दीचा रंग हा खाकी असलेले तुम्हाला फोटो, व्हिडिओतून दिसलं असेल मग कोलकाता पोलीस सफेद वर्दी का घालतात हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचबाबत जाणून घेऊया.
कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर देशभरात कोलकाता पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. पोलीस या प्रकरणात निष्काळजीपणा करतायेत असा आरोप लोक करत आहेत. हायकोर्टानेही सरकारपासून पोलीस प्रशासनाला फटकारलं. काश्मीर असो वा कन्याकुमारी, पोलिसांना खाकीच्या रंगाने ओळखले जाते. त्यामागची कहाणी रंजक आहे. जेव्हा इंग्रज भारतात आले होते तेव्हा त्यांनी पोलिसांसाठी पांढरा रंग निश्चित केला.
सफेद रंगाचा ड्रेस पोलिसांसाठी खूप चांगला दिसत होता. मात्र पांढऱ्या रंगाची एक मोठी समस्या अशी होती की, भारतातील धुळीच्या, कच्च्या रस्त्यांवर पोलिसांचा गणवेश लवकर खराब होत असे. पोलिसांच्या नियमावलीनुसार, मळकट आणि खराब गणवेश घालणे हे शिस्तीचं उल्लंघन करण्यासारखे आहे. अशा स्थितीत इंग्रज पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतःहून गणवेश डाई करायला सुरुवात केली. त्याकाळी डाई करण्यासाठी चहापत्तीचा वापर केला जात होता. ज्यामुळे व्हाइट यूनिफॉर्मचा रंग हळूहळू फिका पडू लागला. मीडिया रिपोर्टनुसार, १८४७ मध्ये नॉर्थवेस्ट फ्रंटियरच्या गर्वनर जनरलनं एका सैनिकाला खाकी रंगाचा ड्रेस घातलेला पाहिला तेव्हापासून पोलिसांच्या वर्दीसाठी खाकी रंगाची निवड करण्यात आली. पश्चिम बंगालच्या अन्य जिल्ह्यात पोलीस खाकी घालतात पण कोलकाता पोलीस सफेद रंगाचा ड्रेस घालतात. त्यामागे २ कारणे सांगितली जातात.
कोलकाता पोलीस आणि बंगाल पोलीस वेगवेगळे आहेत. १८६१ मध्ये कोलकाता पोलिसांची एक यंत्रणा होती जी राज्य पोलिसांपेक्षा वेगळी होती, जी ब्रिटिश राजवटीत बनवलेल्या नियमांनुसार तयार करण्यात आली होती. जी फक्त शहराला लागू होती अशा परिस्थितीत त्या काळातील कोलकाता पोलिसांचा पोशाख त्यांच्या खास ओळखीसाठी वेगळा ठेवण्यात आला होता. कोलकाता पोलीस आजही ब्रिटीशकालीन ड्रेस कोड पाळतात. मात्र, काहींच्या मते, कोलकात्यात उष्णता खूप असते त्यामुळे पांढरा गणवेश असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना खूप दिलासा मिळतो असाही तर्क दिला जातो. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले कोलकातामध्ये वर्षभर उष्ण आणि दमट वातावरण राहते. अशा परिस्थितीत पांढऱ्या रंगाचा पोशाख पोलिसांसाठी योग्य आहे. पोलिसांच्या कामात सोय व्हावी म्हणून त्यांच्या गणवेशाचा रंग पांढराच राहू दिला असल्याचं सांगण्यात येते.