पुरुषाचे पुरुषांशी संबंध आणि महिलेचा महिलेशी संबंध, हा सध्या जगभर चर्चेचा विषय. अनेक देशांमध्ये हे संबंध उघडपणे ठेवले जाऊ लागले आहेत. काही देशांमध्ये याला कायदेशीर मान्यता आहे तर कुठे हा गंभीर गुन्हा असल्याने कठोर शिक्षा ठोठावली जाते. भारतातही याचे लोण पोहोचले आहे, परंतु सरकारने या विवाहांना अद्याप कायदेशीर मान्यता दिलेली नाही. मानवाचा हा गुण माश्यांनाही लागला की काय, असे वाटावे अशी स्थिती समोर आली आहे.
या सवयीमागे कोण? मानवाने हा निर्णय स्वत: घेतला आहे. परंतु, माश्यांनी हे काही स्वेच्छेने केलेले नाही. मानवी कृतीमुळे त्यांना हे करणे भाग पडत आहे. या पृथ्वीतलावर मानवाने केलेल्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम किटकांवरही होऊ लागला आहे. यामुळे काहींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे तर काहींच्या सवयी बदलून गेल्या आहेत.
नेमके काय घडले? जर्मनीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर केमिकल इकोलॉजीच्या संशोधकांनी माश्यांबाबत केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार, नर आणि मादी माशी आता एकमेकांमध्ये फरक समजू शकत नाहीत. त्यामुळेच नकळतपणे मिलनासाठी नर नराकडे जात आहे आणि मादी मादीकडे जात आहे. संशोधनात आढळले की, १० नर माशींपैकी फक्त ७ माश्या मिलनासाठी मादी माशीकडे जात आहेत, तर तीन नर माशा नर माशीकडे जात आहेत.
शास्त्रीय कारण काय? संशोधनानुसार, वातावरणातील ओझोनचे प्रदूषण वाढल्याने माश्यांवर दुष्परिणाम होत आहे. या प्रदूषणामुळे माश्यांमध्ये ‘फेरोमोन्स’ नावाचे संप्रेरक (हार्मोन) तयार होत नाही. त्यामुळे त्यांना नर आणि मादी हा फरक ओळखण्यात अडचणी येत आहेत. प्रदूषणामुळे आता या फ्रूट फ्लाय म्हणजेच फळांवर घुटमळणाऱ्या माश्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण बनले आहे.