ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि. १३ - पुत्तिंगल देवी मंदिरातील अग्नि दुर्घटनेत होरपळून मरण पावलेल्या नागरीकांच्या मृतदेहांची ओळख पटवणे खरोखरच खूप कठीण बनले आहे. आप्तजनांची ओळख पटवता येत नसल्याने मृतदेह अदलाबदलीच्या काही घटना समोर आल्या आहेत. तिरुअनंतपूरमजवळील मुद्दक्कल येथे रहाणा-या भवानी या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला अशाच अनुभवातून जावे लागले.
भवानी यांचा २९ वर्षीय नातू प्रमोद आणि मुलगा राजन दोघे मंदिरातील आतशबाजी पाहण्यासाठी गेले होते. रविवारी दुपारी भवानी यांना त्यांच्या नातवाचा प्रमोदचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. भवानी यांचा दुसरा मुलगा प्रकाश रविवारी दुपारी त्रिवेंद्रम मेडीकल कॉलेजच्या रुग्णालयात गेले व तिथून एका जळलेला मृतदेह घरी आणला.
मृतदेह अत्यंत वाईट स्थितीत असल्याने कुटुंबियांनी लवकर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. नातवाचा मृत्यू आणि मुलगा बेपत्ता असल्याने भवानी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याचवेळी गावातील काही मुलांनी पुत्तिंगल देवी मंदिर दुर्घटनेतील जखमींची यादी वेबसाईटवर पाहिली. त्यामध्ये प्रमोदचे नाव होते.
त्यांनी लगेच प्रमोदच्या कुटुंबाला ही माहिती दिली. प्रमोदची आई कोल्लमच्या रुग्णालयात पोहोचली. त्यावेळी प्रमोद तिथे जिंवत होता. त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. भवानीच्या कुटुंबाने दुस-याच कुणावर प्रमोद समजून अंत्यसंस्कार केले होते. अंत्यसंस्कारासाठी घरी आणलेला मृतदेह पूर्णपणे जळालेला होता. ओठांच्या वर काही टाके होते. दातांमध्ये अंतर होते या खूणांवरुन तो मृतदेह प्रमोदचा असल्याचा माझा समज झाला असे प्रकाश यांनी सांगितले.
सोमवारी प्रकाश यांना तिरुअनंतपूरमवरुन एक फोन आला होता. ते आपल्या मुलाला शोधत होते. मुलाची ओळख सांगतांना त्यांनी ओठांच्यावर टाके असल्याचे सांगितले. कदाचित तो त्यांचा मुलगा असावा असे प्रकाश यांनी सांगितले. प्रमोद एक-दोन दिवसात घरी येईल पण भवानीला आता मोठा मुलगा राजनची चिंता लागून राहिली आहे. कारण राजनची अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
उत्सवात काम करण्याचे पाचशे रुपये मिळतील म्हणून प्रमोद आणि राजन तिथे गेले होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांच्या आतशबाजी दरम्यान भीषण आग लागून १०० पेक्षा जास्त नागरीकांचा मृत्यू झाला होता.