गणेशोत्सवात आपल्याला बाप्पाची अनेक विविध रूपं पाहायला मिळतात. सर्वांची विघ्न दूर करणाऱ्या या विघ्नहर्त्याची सुंदर रूपं पाहून मन अगदी प्रसन्न होतं. एवढचं नाहीतर यामध्ये अनेक मौल्यवान गणेश मूर्तींचाही समावेश असतो. पण तुम्ही जगातील सर्वात मौल्यवान बाप्पा पाहिला का? सुरतमध्ये जगातील सर्वात मौल्यवान गणपती घडवण्यात आला आहे.
सुतरमधील प्रसिद्ध हिरेव्यापारी कनुभाई आसोदरिया यांच्या घरात हा बाप्पा विराजमान असतो. एवढचं नाहीतर याची सर्वात मौल्यवान गणपती म्हणून नोंदही करण्यात आली आहे. कनुभाईंचा बाप्पा तब्बल 182.3 कॅरेटचा असून 36.5 ग्रॅम वजनाची हिऱ्याचा आहे.
खरं आश्चर्य तर अजून तुम्ही ऐकलचं नाही. कनुभाईंकडे असलेली ही मूर्ती स्वयंभू आहे. याबाबत सांगताना कनुभाईंनी सांगितले की, साधारणतः 12 वर्षांपूर्वी बेल्जियममधून त्यांच्याकडे आलेल्या कच्च्या पैलू नसलेल्या हिऱ्यांमध्ये हा हिरा त्यांना सापडला. नीट पाहिल्यानंतर त्याला निसर्गतः गणरायाचा आकार असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी तो हिरा देवघरात ठेवला.
गणेशाची ही मूर्ती कनुभाईंचं आराध्या दैवत आहे. त्यामुळे त्याची किंमत करणं कनुभाईंना अजिबात शक्य नाही. पण इतर हिरे व्यापारी या मूर्तीची किंमत जवळपास 600 कोटींच्या घरात असल्याचे सांगतात. तसेच बाजारातील किमतीप्रमाणे ही मूर्ती कोहिनूर हिऱ्यापेक्षाही महाग आहे. कारण कोहिनूर हिरा 105 कॅरेटचा असल्याचे सांगण्यात येतं. तर ही मूर्ती 182.3 कॅरेटची आहे.
अनेक देशी-विदेशी लोकांकडून कनूभाईंना ही मूर्ती विकण्यासाठी मोठ्या मोठ्या ऑफर्स आल्या होत्या. पण त्यांनी विकण्यासाठी स्पष्ट नकार दिला.