मलप्पुरम : केरळच्या मलप्पुरम येथील प्लास्टिक कचरा वेचणाऱ्या ११ महिलांचे नशीब अखेर फळफळले आहे. शुक्रवारी त्यांना तब्बल १० कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. या महिलांकडे लॉटरीचे तिकीट काढण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रत्येकी २५ रुपये गोळा करून २५० रुपयांचे तिकीट खरेदी केले होते.
बुधवारी लॉटरी लागल्याचे कळाले तेव्हा त्या ११ महिला रबरी हातमोजे घालून महापालिकेच्या गोदामात प्लास्टिक कचरा वेगळा करत होत्या. लॉटरीचे तिकीट लागल्याचे कळताच अनेक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्याभोवती गर्दी केली.महिलांनी या अगोदरही असेच पैसे गोळा करून ३ वेळा तिकीट खरेदी केले होते.
अनेक संकटे असूनही...
लॉटरी विजेत्या महिला अतिशय मेहनती आहेत. अनेकांना त्यांच्या कर्जाची परतफेड करायची आहे. त्या सर्व अतिशय साध्या घरात राहतात आणि अनेक संकटांचा सामना करतात.
काम सुरूच ठेवणार
हरित योजनेत काम करत असलेल्या या महिलांना त्यांना ७,५०० ते १४,००० रुपयांपर्यंत मानधन देण्यात येते. लॉटरी जिंकल्यानंतर ही आम्ही आमचे काम सोडणार नसल्याचे या महिलांनी सांगितले.