बर्लिन: जर्मनीतील एका निवृत्ती वेतन धारक वृद्धानं दुसऱ्या जागतिक युद्धात वापरलेला एक रणगाडा तब्बल ७५ वर्षे त्याच्या घरात ठेवला होता. याशिवाय त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात अवैध हत्यारं आढळून आली. यासाठी न्यायालयानं त्याला दोषी ठरवलं आहे. या व्यक्तीचं वय ८४ वर्षे आहे. वृद्ध व्यक्ती हिवाळ्यात रणगाड्याचा वापर करायची. त्यावेळी रणगाडा काहींच्या दृष्टीस पडला. बीबीसीनं याबद्दलंच वृत्त दिलं आहे.
एक अमेरिकन संग्रहालय वृद्धाकडून पँथर रणगाडा विकत घेण्याच्या विचारात असल्याची माहिती वृद्धाच्या वकिलानं दिली. दुसऱ्या जागतिक युद्धात जर्मनीनं तैनात केलेला हा सर्वोत्तम रणगाडा असल्याचं अनेक अमेरिकन इतिहासकारांनी सांगितलं आहे. घरात रणगाडा आणि शस्त्रसामग्री ठेवणाऱ्या ८४ व्यक्तीला १४ महिन्यांचा निलंबित तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. निलंबित शिक्षेचा अर्थ गुन्हेगाराला कैद होणार नाही. निलंबित तुरुंगवासासोबत वृद्धाला २,५०,००० युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे.
जर्मनीच्या कायद्याप्रमाणे अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगाराचं नाव जाहीर केलं जात नाही. २०१५ मध्ये आरोपीच्या हायकेंडोर्फमधील घरातून रणगाडा आणि लष्करी हत्यारं जप्त करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात खटला सुरू झाला. त्याची सुनावणी नुकतीच संपली. न्यायालयानं वृद्धाला दंड ठोठावला असून दोन वर्षांत रणगाडा संग्रहालयाला सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.
हायकेंडोर्फमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रणगाड्यासोबतच इतर वस्तूंसाठी वृद्धाकडे संपर्क साधला. त्यात पिस्तुलं आणि असॉल्ट रायफल्सचा समावेश असल्याची माहिती वृद्धाच्या वकिलानं दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी २०१५ मध्ये वृद्धाच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती शस्त्रांचा मोठा खजिना लागला. वृद्धाच्या संपूर्ण घराची झडती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांना रणगाडा आढळला. तो बाहेर काढण्यासाठी २० जवानांना तब्बल ९ तास लागले.