ऑनलाइन लोकमत
कुरुक्षेत्र (हरियाणा), दि. ४ - रुग्णालयाला परवानगी मिळावी यासाठी हरियाणातील एका रुग्णालयाने चक्क बोगस रुग्णांना भरती केल्याचा प्रकार समोर आला असून संबंधित वृत्त एनडीटिव्हीने दिले आहे. या मोबदल्यात रुग्णालयाने ग्रामस्थांना चक्क प्रत्येकी २०० रुपये आणि मोफत जेवणाचे गाजर दाखवल्याचा आरोप केला जात आहे.
कुरुक्षेत्र येथे आदेश रुग्णालय सुरु झाले असून या रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा हवा आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या नियमानुसार वैद्यकीय महाविद्यालयात १०० एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी ६०० बेड आणि किमान ७० टक्के रुग्ण असणे आवश्यक आहे. रुग्णालय प्रशासनातील एका कर्मचा-यांना रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढवण्यासाठी स्थानिकांना पैशाचे आमीष दाखवले. रुग्णालयात एका दिवसासाठी रुग्ण म्हणून भरती होण्याची अॅक्टिंग करा, यासाठी तुम्हाला २०० रुपये दिले जाईल असे त्या कर्मचा-याने ग्रामस्थांना सांगितले. रुग्णालयात आरोग्य मंत्री व मेडिकल काऊन्सिलचे अधिकारी रुग्णालयात येतील, त्यांच्यासमोर तुम्हाला फक्त अॅक्टिंग करायची आहे असे त्या कर्मचा-याने नमूद केले आहे. काही सतर्क ग्रामस्थांनी हे सर्व संभाषण रेकॉर्ड करत त्याची ऑडिओ क्लिपच जाहीर केली आहे.