इंदूर - मध्य प्रदेशमधील इंदूर प्राणी संग्रहालयामधून टिया नावाची माकडीण अचानक बेपत्ता झाली आहे. गेल्या महिनाभरापासून प्राणी संग्रहालय प्रशासन टियाला शोधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राणी संग्रहालयातील व्यवस्थापक डॉक्टर उत्तम यादव यांनी सांगितले की, टिया प्राणी संग्रहालयामध्ये खूप रुळली होती. ती प्रत्येक जेणाऱ्या जाणाऱ्या मुलांकडे आणि त्यांच्या नातेवाईकांकडे येत जात असे. तसेच टियाला कधीही पिंजऱ्यात बंद करून ठेवण्यात आले नव्हते. त्यामुळे ती संपूर्ण प्राणी संग्रहालयात फिरत असे.
प्राणी संग्रहालयात येणाऱ्या मुलांसोबत आणि इतर लोकांसोबत बसून टिया अन्नपदार्थ खात असे. तसेच तिला आले घातलेली चहा अधिक आवडत असे. प्राणी संग्रहालयातील प्रशासन टियाला सातत्याने शोधण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, प्राणी संग्रहालयात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षकही उपस्थित आहेत. त्यानंतरही टिया बेपत्ता आहे. दरम्यान, टिया खूप माणसाळलेली असल्याने ती कुणाबरोबर तरी गेली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याआधीही एक कुत्रा प्राणी संग्रहालयातून अचानक बेपत्ता झाला होता. तो आतापर्यंत सापडलेला नाही.
यादव यांनी सांगितले की, टियाबाबत अचूक माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला आम्ही प्राणीसंग्रहालयाचे मोफत तिकीट देणार आहोत. त्यांनी सांगितले की, १० महिन्यांच्या टियाला आल्याचा चहा आवडत असे. तसेच प्राणीसंग्रहालयामध्ये असलेल्या फूड झोनमध्ये ती नेहमी चहाचे घोट घेताना दिसत असे. यादव यांनी सांगितले की, या माकडिणीला चहा पिताना पाहून पर्यटक आणि लहान मुले खूप आनंदित होत.