सतत जगभरातील वेगवेगळ्या विचित्र आजारांची माहिती समोर येत असते आणि लोकांना आश्चर्याचा धक्का देत असते. अशाच एका दुर्मीळ आजाराने एका लहान मुलीचा जीव घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे या आजारात लहान मूल बाल्यावस्थेतच वृद्ध होतं आणि त्याचा मृत्यू होतो. या असामान्य दुर्मीळ आजारामुळे (Genetic Progeria Disease) युक्रेनमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीचा जीव गेला.
thenews.com.pk ने दिलेल्या वृत्तानुसार, जगभरात या आजाराचे केवळ १६० रूग्ण आहेत. मीडिया रिपोर्ट्नुसार, या मुलीचं नाव अन्ना साकीडोन असून तिचं वास्तविक जैविक वय ८० वर्ष होतं. गेल्या महिन्यातच या मुलीचा ८वा वाढदिवस होता. पण त्यावेळी तिचं वजन केवळ १७ पाउंड होतं.
अन्नाची आई इवानाने सांगितले की, अकाली वृद्धत्व आल्याने तिच्या अंतर्गत अवयवांनी काम करणं बंद केलं होतं. ज्यामुळे तिचं निधन झालं. इवानाने म्हणाली की, आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ती तिच्या सगळ्या गोष्टींचा त्याग करण्यासाठी तयार होती.
अन्नावर उपचार करणारे डॉक्टर नादेहदा कॅटामॅम म्हणाले की, 'ती एक फार अद्भुत आणि बहादूर मुलगी होती. आम्ही तिला वाचवू शकलो नाही याचं आम्हाला दु:खं आहे.
ते म्हणाले की, 'या आजाराचं नाव प्रोजेरिया आहे. ज्यात लहान मुलाचं वय ८ ते १० वर्षे असतं, पण त्यांचं वास्तविक वय हे ७० ते ८० दरम्यानचं असतं. या आजारात शरीरातील अवयवांचं वय वेगाने वाढू लागतं. हाडांचा विकास फार कमी वेगाने होऊ लागतो आणि इतर अवयव वेगाने विकसित होतात. असे रूग्ण सामान्यपणे स्ट्रोकने दगावले जातात'.
अन्नाच्या आईने एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, 'अन्ना महिन्याची असतानापासूनच चांगली चालू लागली होती. ११ महिन्याच्या वयात ती माझ्यासोबत खेळू लागली होती. ती सगळीकडे माझा पाठलाग करत होती. पण प्रकाशाची तिला भीती वाटत होती. त्यामुळे केवळ रात्री बाहेर जात होती'.