नवी दिल्ली- ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन लोकांच्या सुविधेसासाठी विविध प्रोडक्ट विकत असल्याचा दावा करते. अॅमेझॉनवर सर्व काही मिळत हे गृहीत धरून एका तरूणीने अॅमेझॉनकडे केलेली मागणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. अॅमेझॉन ट्विटरवरही चांगलंच एक्टिव्ह आहे. त्यामुळे लोकांच्या तक्रारी, सूचना व मागण्या याकडे लक्ष घालत अॅमेझॉन तप्तरतेन रिप्लायही करते.
एक ट्विटर युजर तरूणीने अॅमेझॉनला ट्विट करत लिहिलं की, 'तुम्ही स्वतःला दुनियेतील सर्वात मोठी वेबसाइट समजता. पण तुमच्या वेबसाइटवर अनेक तास शोधूनही मला जी गोष्ट हवी ती मिळाली नाही'. तरुणीच्या या ट्विटवर अॅमेझॉनने लगेच रिप्लाय केला. 'आम्ही ग्राहकांची गरज समजण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. तसंच आमच्या वस्तूंच्या यादीला वाढविण्याचा प्रयत्नही आम्ही करतो आहोत. तुम्ही वेबसाइटवर काय शोधत आहात?याबद्दल माहिती द्याल का?असं अॅमेझॉनने तरुणीला उत्तर देताना म्हटलं. अॅमेझॉनच्या या ट्विटवर मुलीने दिलेलं उत्तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 'बस एक सनम चाहिए आशिकी के लिए', ही गाण्याची ओळ ट्विट करत या तरुणीने अॅमेझॉनकडे थेट सनम (जोडीदार) मागितला. तरुणीच्या या मजेशीर ट्विटवर अॅमेझॉननेही तितकंच मजेशीर उत्तर दिलं. 'ये अक्खा इंडिया जानता है, हम तुमपे मरता है। दिल चीज क्या है जानम, अपनी जान तेरे नाम करता है', असं उत्तर अॅमेझॉनने दिलं.हे ट्विट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, अॅमेझॉन वेबसाइटने नुकतंच त्यांच्या प्राइम मेंम्बर्स 10 कोटींचा आकडा गाठत रेकॉर्ड केला आहे. अॅमेझॉन प्राइम सेवेच्या अंतर्गत ग्राहकांना ऑर्डर केलेल्या वस्तूची दोन दिवसांच्या आत डिलिव्हरी मिळते तसंच ऑनलाइन व्हिडीओसारख्या अनेक सुविधा मिळतात.